मुंबई : ’मी मराठी’ वरील मंगळसूत्रची शतकोत्तरी घोडदौड

मुंबई १७ मार्च – मी मराठी वाहिनीवरील मंगळसूत्र या दैनंदिन मालिकेचे १०० भाग नुकतेच पूर्ण झाले आहेत.सध्या मी मराठीवर सुरु असलेल्या वेगळ्या विषयांवरील आशयघन मालिका,तसेच ब्रम्हांडनायक,कृपासिंधु, आदिशक्ती सारख्या भ्क्तीरूप मालिकांमुळे ही वाहिनी प्रेक्षकांच्या अधिकाधिक जवळ जात आहे.’वरदलक्ष्मी क्रिएशन्स’ निर्मित मंगळसूत्र या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या मालिकेमुळे मी मराठीची प्रेक्षकांच्या मनावरची पकड घट्ट झाली आहे.

या मालिकेची शतकोत्तरी घौडदौड हे त्याचे प्रतिक म्हणता येईल. आपला प्रेक्षक हा कुटुंबवत्सल आहे, नातेसंबंध जपणारा आहे याची जाणीव असणार्या  मी मराठी वाहिनीने मंगळसूत्रसारखी नावातच एक प्रेमाचा, वात्सल्याचा ओलावा असणारी दैनंदिन मालिका प्रेक्षकांसमोर आणली तेव्हाच मालिकेचे अर्धेअधिक यश निश्चित झाले होते. महाराष्ट्रभर असंख्य चाहते असणार्याे अलका कुबल -आठल्ये यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. या मालिकेद्वारे अलका कुबल – आठल्ये प्रथमच मालिकेची निर्माती म्हणून प्रेक्षकांसमोर आली आहे. साहाजिकच तिच्या चाहत्यांसाठी ही मालिका म्हणजे एक पर्वणी ठरली आहे.

निर्माती म्हणून सुरुवातीला या माध्यमाबाबत काहीसे दडपण आले, असे म्हणणारी अलका मालिकेने १०० भाग पूर्ण केल्यावर मात्र रिलॅक्स झाली आहे. ती म्हणते की, मालिका हे माध्यम तसे माझ्यासाठी नवीन. त्यातही मालिकेचा टीआरपी, यशस्वीता याची गणिते वेगळी आहेत. मालिका सुरु करताना थोडे दडपण होते. पण सुरुवातीपासून ही मालिका प्रेक्षकांना आवडू लागली आणि आमच्या टीमचा व माझाही आत्मविश्वास वाढत गेला. आता मालिकेने शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे आम्ही मागे वळून न पाहता मालिका अधिकाधिक रंजक कशी होईल याकडे लक्ष देणार आहोत.‘ मालिकेच्या यशात टीमइतकाच ’मी मराठी’ वाहिनीचा मोलाचा वाटा आहे. विशेषतः ’मी मराठी’ चे चेअरमन आणि संचालक अशोककुमार गुप्ता, उपाध्यक्ष हरीना चंदन, कार्यकारी निर्माता मुकुंद पेडणेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यांच्या सहकार्यामुळे आमची यशस्वी वाटचाल चालू आहे.

मंगळसूत्र’ मालिकेची निर्मिती अलका कुबल-आठल्ये, समीर आठल्ये, शिल्पा मसूरकर या त्रयींनी केली असून तानाजी घाडगे यांनी मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. मालिकेची कथा रामचंद्र सडेकर यांची असून कथाविस्तार-पटकथा सचिन दरेकर व संवाद अरुणा जेगळेकर यांचे आहेत. गीतकार बाबा चव्हाण यांनी शब्दबध्द केलेल्या शीर्षकगीताला स्वरबध्द केले आहे संगीतकार अशोक पत्की यांनी, तर स्वर दिला आहे आघाडीच्या गायिका साधना सरगम यांनी. मालिकेचे छायाचित्रण समीर आठल्ये यांचे आहे. अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये वसुधाच्या प्रमुख व्यत्त*ीरेखेत असून मुलांचे प्राणपणाने रक्षण करणारी, त्यांना शिस्त लागावी म्हणून क्वचित प्रसंगी कठोर होणारी आई त्यांनी रंगविली आहे. सुहास पळशीकर, अनंत जोग, नागेश भोसले, सुरेखा कुडची, किशोरी अंबिये, आनंद अभ्यंकर, आशा साठे, संजय खापरे आदी कलाकारांनी अभिनयाचे एक वेगळे परिमाण या मालिकेला प्राप्त करुन दिले आहेत. वरद चव्हाण, संजय शेजवळ, ऋजूता बागवे, अमृता सकपाळ, त्रियुग मंत्री हे नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे कलाकारही यात आहेत.

मंगळसूत्र’ ही मालिका वसुधा मोहिते या धीरोदात्त स्त्रीचा जीवनालेख अधोरेखित करणारी असून मालिका एक नव्या उत्कंठावर्धक, रोमांचक वळणावर आहे. वसुधाच्या हातून खून झाला आहे. मुंबई पोलिसांनी तिला अटक केली आहे. पण पुढे काय? तिची सुटका होईल का? तिला शिक्षा होईल काय? तिची मुले तिला भेटतील का? अर्थात याची उत्तरे लवकरच मिळणार आहेत.

Leave a Comment