मुंबई : आमदार हर्षवर्धन जाधव मारहाणप्रकरणी विधानसभेत गदारोळ

मुंबई १७ मार्च – औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी अमानुष आणि बेदमपणे केलेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटले.या मारहाणीचा तीव्र निषेध करीत मारहाण करणार्याध पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे,अशी आग्रही मागणी विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी केली.त्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.पोलिस स्टेशनमध्ये दरवाजा बंद करुन पोलिसांनी लाथाबुक्यांनी क्रूरपणे केलेल्या मारहाणीची माहिती स्वतः आ.हर्षवर्धन जाधव यांनी सभागृहात दिली. तेव्हा विरोधकांचा संताप अनावर झाला.सर्व सदस्यांनी हौद्यात उतरुन सभागृहाचे कामकाज तीनवेळा रोखून धरले. अखेर गोंधळातच विधानसभा उपाध्यक्षांनी दिवसभराचे कामकाज उरकून सभागृह तहकूब केले.

कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीप्रकरणी शिवसेना सदस्य विनोद घोसाळकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी लोकप्रतिनिधी म्हणून कायदे हातात घेवून अरेरावी करण्यास कोणत्या कायद्याने मान्यता दिली आहे, असा प्रतिप्रश्न केला. राजकीय सूड भावनेतून काही केलेले नाही. आपण गृहमंत्री नव्हतो तेव्हापासून जाधव यांच्यावर विविध गुन्ह्यांची नोंद आहे, असे पाटील म्हणाले.

मनसेचे हर्षवर्धन जाधव यांनी आपल्यावर अवैध धंदे बंद करण्याचा प्रयत्न सतत केल्याने जाणीवपूर्वक पोलिसांनी हल्ला केल्याचे सांगितले. यावेळी गृहमंत्र्यांशी त्यांची शाब्दीक चकमक झाली. तेव्हा काही काळ सदनात तणावाचे वातावरण होते. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पोलिसांनी कायद्याने कारवाई न करता स्वतःच कायदा हातात घेतल्याबद्दल कडक शब्दात गृहमंत्र्यांचा समाचार घेतला. यावेळी दोन्ही बाजूचे सदस्य संतप्त होते. पोलिस अधिकार्यां च्या निलंबनाची मागणी काही सत्ताधारी सदस्य करु लागले. सदनात कामकाज करण्यास वातावरण अनुकूल नसल्याने प्रथम एक तासासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. पुन्हा कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधकांनी पुन्हा गोंधळ घातल्याने विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी ३५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. परत गोंधळ तसाच राहिल्याने उपाध्यक्षांनी अर्धा तासासाठी कामकाज तहकूब केले. यावेळीदेखील विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दोन्ही बाजूत समेट होण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पुन्हा सभागृह सुरु होताच विरोधकांनी गोंधळ घातल्याने दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

Leave a Comment