पुणे जिल्हा व अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक न्यायालयांचा निकाल मराठीत

पुणे दि १७ – जानेवारी २०१० पासून पुणे जिल्हा व अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक न्यायालयांनी त्यांचा निकाल मराठी भाषेत देण्यास सुरवात केली असून आत्तापर्यंत सुमारे १०० निकाल मराठीत दिले गेले आहेत.
  
राज्य ग्राहक मंच आयोगाने सर्व जिल्हा ग्राहक न्यायलयांना कामकाजात मराठीचा वापर करण्याचे आदेश सहा महिन्यांपूर्वीच दिले आहेत. पुणे फोरमच्या अध्यक्षा न्यायाधीश अंजल देखमुख यांनी जानेवारीत हे पद स्वीकारल्यानंतर या आदेशाचे अम्मलबजावणी सुरू झाली असून महाराष्ट्रात मराठीत जजमेंट देणारे पुणे हे पहिले शहर ठरले आहे असे सांगून त्या म्हणाल्या की ग्राहकाने त्याची तक्रार इंग्रजीत दाखल केली तरी नोटिसा काढणे व निकाल मराठीतच दिला जात आहे. या न्यायालयात तक्रारदार वकिलाशिवायही आपली केस मांडू शकतो त्यामुळे स्वतःची बाजू मांडताना ती स्थानिक भाषेत मांडणे हे संबंधितांना सोयीचे ठरते. अर्थात एखाद्याला मराठी येतच नसेल तर तो इंग्रजीचा वापर करू शकतो असेही त्या म्हणाल्या.
 
ग्राहक हितवर्धिनीचे संस्थापक सुधाकर वेलणकर यांनी न्यायालयाच्या मराठीत न्याय देण्याच्या कामाचे स्वागत केले आहे मात्र ग्राहकाला राष्ट्रीय ग्राहक न्यायालयात जायची वेळ आली तर तेथील कामकाज इंग्रजीतूनच चालत असल्याने अडचण येण्याची शक्यता व्यक्त करताना निकाल देताना त्याचे इंग्रजी भाषांतर करूनच दिला जावा व त्यासाठी ग्राहकाकडून योग्य फी आकारावी अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे.
 
राज्य शासनानेही १६ सप्टेंबरला अध्यादेश काढून ग्राहक न्यायालयांचे काम मराठीत चालविले जावे असे आदेश दिले आहेत.

Leave a Comment