नागपूर : मोनिका हत्याकांडाचा सुगावा मिळविण्यासाठी लावले ‘बॉक्स’

नागपूर १७ मार्च – मोनिका हत्याकांडातील आरोपींची माहिती देण्याबाबत लोकांनी मौनव्रत बाळगल्यानंतर सुगावा मिळावा,यासाठी विद्यार्थ्यांपाठोपाठ प्राध्यापकांनीही एकजुटीने आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.आता संतप्त विद्यार्थ्यांनी अफलातून उपक्रम सुरू केला आहे.गोपनीय माहिती देण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात बॉक्स लावले आहेत.साईन आऊटडेला झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी सुपारी देऊन मोनिकाचा गेम करण्यात आल्याची माहिती समोर येऊ लागली आहे.

मोनिकाच्या मारेकऱ्यांचा शोध लावण्यासाठी पोलिस प्रशासनाने युद्धस्तरावर प्रयत्न चालविले असले तरी त्यात त्यांना अद्यापपर्यंत यश आलेले नाहीत. दिवसाढवळ्या घडलेले हत्याकांड बघणारे अनेक जण असताना कोणीही माहिती देत नसल्याने पोलिसांना तपासाची दिशा ठरविणेच कठीण होऊन बसले आहे. अशा स्थितीत वेगवेगळ्या स्वरूपाच्या आंदोलनांनी पोलिसांसमोर नवे संकट उभे केले आहे. विद्यार्थ्यांनीसुद्धा आरोपीच्या शोधार्थ चालविलेल्या प्रयत्नांना अजूनपर्यंत यश आल्याचे दिसत नाही. मोनिकाला न्याय मिळायलाच हवा याकरिता खर्या् अर्थाने प्रयत्नरत असलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरातच एक बॉक्स लावला.

हत्याकांडाबाबत किवा मारेकऱ्यांसंदर्भात कोणतीही माहिती असल्यास ती बॉक्समध्ये टाकून मोनिकाला न्याय देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान एसआरएम कॉलेजच्या प्राचार्या पी. देवनानी, डॉ. आर. एच. पारीख, डॉ. सी. सी. हांडा, डॉ. ए. आर. बापट यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त डॉ. अंकुश धनविजय यांची भेट घेतली. आरोपींना तत्काळ अटक करा, केडीके परिसरात पोलिस चौकी स्थापन करा यासह अन्य काही मागण्याचे निवेदन त्यांनी आयुक्तांना दिले.

Leave a Comment