देशाची दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या मिझुहो बँकेची एटीएम केंद्र दोन तासांसाठी बंद पडले

टोकियो दि १७ – अनेक अडचणींचा सामना करत असलेल्या जपानी नागरिकांवर आज देशाची दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या मिझुहो बँकेची एटीएम केंद्रे दोन तासांसाठी बंद पडल्याने निराळ्याच अडचणींना तोंड देण्याची वेळ आली.टोकियोतील नागरिक किरणोत्साराच्या भीतीने घरातच थांबले आहेत मात्र जीवनावश्यक वस्तूची साठवण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.त्यासाठी पैसे एटीएमच्या माध्यमातूनच काढले जात आहेत.मात्र या बँकेच्या अनेक शाखांतील एटीएम वर ताण आल्याने दोन तास ही यंत्रे बंद पडली. अर्थात बँकेने अथक प्रयत्नांनी ती पुन्हा कार्यान्वित करण्यात यश मिळविले आहे.मात्र कडाक्याच्या थंडीतही या बँकेचे कर्मचारी यंत्रे बंद पडल्याचे सांगण्यासाठी केंद्राबाहेर उभे होते आणि नागरिकांची गैरसोय होत असल्याबद्दल खेद व्यक्त करत होते.

टोकियोची लोकसंख्या सुमारे १३ दशलक्ष इतकी असून जे परिसर नेहमी गर्दीने गजबजलेले असतात ते आता किरणोत्साराच्या भीतीने ओसाड पडले असून लोकांना घरातच थांबण्याच्या सूचना कार्यालयांनीही दिल्या आहेत.

Leave a Comment