तुकाराम बीजेसाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध

पुणे दि १७ – संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले तो तुकाराम बीजेचा दिवस साजरा करण्यासाठी देहू गावांत जोरदार तयारी सुरू झाली असून जिल्हा प्रशासन या सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे.पुण्यापासून २५ किमीवर असलेल्या देहूत या सोहळ्यासाठी यंदा तीन लाख वारकरी भाविक येण्याचा अंदाज आहे.हा सोहळा २१ मार्च रोजी साजरा होणार आहे.
 
जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी या संदर्भात सर्व संबंधित विभागांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले असून त्यात पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, सांडपाणी व्यवस्था यांचा समावेश आहे. गुरूवारी या विभागांची बैठक बोलावण्यात आली असून त्यात कामाची योजना तयार केली जाणार आहे.
 
यंदा अपेक्षित असलेली भाविक संख्या पाहता पिण्याच्या पाण्यासाठी पाच टँकर सज्ज ठेवण्यात येणार असून सहा फिरती स्वच्छतागृहेही तैनात करण्यात येणार आहेत. मंदिर परिसरात तसेच गावात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात येणार आहे तसेच भाविकांच्या मदतीसाठी पोलिस बूथ व मदतकेंद्रेही स्थापण्यात येणार आहेत. वारकऱ्यांच्या प्राथमिक गरजा पुरविण्यासाठी सर्व त्या उपाययेाजना करण्यात येत असून आणीबाणीच्या परिस्थितीसाठी रूग्णवाहिका, प्रथमोपचार यांचीही सोय करण्यात येणार आहे. पुण्यातून यादिवशी जादा बस गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Leave a Comment