जर्मनीत सतरापैकी सात रिअॅक्टर तातडीने ताप्तुरते बंद : चॅन्सलर अँजेला मार्केल

बर्लीन दि १७ – जपानमध्ये भूकंपानंतर उद्भवलेल्या त्सुनामीमुळे तेथील अणुभट्ट्यांमध्ये निर्माण झालेली कठीण परिस्थिती लक्षात घेऊन जर्मनीनेही त्यांच्या देशातील अणुउर्जा केंद्रात बसविण्यात आलेल्या सतरा रिअॅक्टर्सपैकी जुने झालेले सात रिअॅक्टर तातडीने ताप्तुरते बंद करण्याचा निर्णय घेतला असून तशी घोषणा चॅन्सलर अँजेला मार्केल यांनी पत्रकारपरिषदेत केली आहे.ही घोषणा करण्यापूर्वी जर्मनीच्या ज्या पाच राज्यात हे अणुऊर्जा प्रकल्प आहेत,त्या राज्याच्या प्रमुखांची एक बैठक घेण्यात आली आणि त्यात जुने सात रिअॅक्टर ताप्तुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असे समजते.१९८० सालापासून कार्यरत असलेले हे रिअॅक्टर जुलैच्या मध्यापर्यंत बंद करण्यात येणार आहेत.
   
जर्मनीतील शूल्सवि होस्टेन येथील आठवा रिअॅक्टर १९८३ साली कार्यान्वित करण्यात आला होता मात्र तेथे घडलेल्या अनेक अपघातांमुळे तो अनिश्चित काळासाठी यापूर्वीच बंद करण्यात आला आहे.
 
हे सात जुने रिअॅक्टर बंद करण्याचा निर्णय देशाने जो नवीन ऊर्जा कायदा केला आहे त्याला अनुसरून घेण्यात आला आहे. या नव्या कायद्यानुसार फेडरल तसेच राज्य सरकारे यांना अणुऊर्जा प्रकल्पात कांही आणीबाणी उद्भवली तर जरूर ते निर्णय स्वतंत्रपणे घेण्याचे अधिकार आहेत. या जुन्या रिअॅक्टरच्या सुरक्षा चाचण्या घेतल्यानंतर ते किती काळ बंद ठेवायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे.
  
याचाच अर्थ जर्मनीत सध्या सतरा पैकी नऊ रिअॅक्टरच कार्यान्वित राहणार आहेत मात्र त्याचा जर्मनीच्या वीजपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. जर्मनीत एकूण वीज उत्पादनापैकी २७ टक्के वीज अणुऊर्जा प्रकल्पातून तयार केली जाते.
 
जर्मनीत चॅन्सलरीत पाच राज्यांच्या प्रमुखांचे चान्सलरसमवेत बैठक सुरूअसतानाच अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध असणारे हजारो कार्यकर्ते व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हा जुने रिअॅक्टर कायमचे बंद केले जावेत यासाठी निदर्शने केली असल्याचेही वृत्त आहे.

Leave a Comment