जपानचे सम्राट अकिहितो यांचा जपानी जनतेला शांतता आणि धीर धरण्याचा संदेश

टोकियो जपान दि १७ – जपानचे सम्राट अकिहितो यांनी आज जपानवर ओढवलेल्या क्रूर संकटाबद्दल जपानी जनतेला शांततेचा आणि धीर धरण्याचा संदेश दिला असून बुधवारी त्यांनी दूरदर्शनच्या माध्यमातून जनतेशी साधलेल्या संवादात अणुउर्जा प्रकल्पातील स्फोटांमुळे देशाची जी बिकट अवस्था झाली आहे त्याबद्दल खूप काळजी वाटत असल्याचे सांगितले आहे.या अडचणीच्या काळात जनतेने एकमेकांना मदत करावी आणि साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
 
जपान अणुउर्जाप्रकल्पात उद्भवलेल्या अडचणी अनपेक्षित असल्याचे तसेच ज्या क्षमतेचा भूकंप जपानमध्ये झाला तोही कल्पनेपलिकडचा असल्याचे सांगून ७७ वर्षीय अकिहितो म्हणाले की निसर्गाने दिलेल्या या अनपेक्षित धक्क्यामुळेच त्यांना जनतेची जास्त काळजी वाटतेआहे. गेल्या आठवड्यातील प्रलयंकारी भूकंपानंतरचा सम्राटांचा हा पहिलाच पब्लीक अॅपिअरन्स होता व त्याचे दूरदर्शन वाहिन्यांनी सर्व काय्रक्रम थांबवून थेट प्रक्षेपण केले.
 
यावेळी जनेतेने बंधूभाव जोपासावा आणि हातीहात देऊन एकमेकांना सांभाळावे असे सांगतानाच त्यांनी या अडचणीतून आपण नक्कीच बाहेर पडणार आहोत असा आशावादही व्यक्त केला. जपानचे सम्राट अकिहितो आणि सम्राज्ञी मिचिको यांनी देशावर आलेल्या संकटात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली असून कोबे येथे १९९५ साली झालेल्या भूकंपातही मृत्यूमुखी पडलेल्या ६४०० नागरिकांच्या नातेवाईकांची त्यांनी भेट घेतली होती आणि त्यांचे सांत्वन केले होते.

Leave a Comment