जगनचे दिवस भरले

जुन्या नेत्यांच्या वारसांनी पैसा खाण्याचे काही साळसूद मार्ग अवलंबिले आहेत.अशा प्रकारात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांची कन्या कनिमोळी हिची चौकशी सुरू झाली आहे.कारण तिने आपल्या वडलांच्या पदाचा गैरवापर करून काही कंपन्यांकडून पैसे उकळले आणि त्या पैशातून वृत्त वाहिन्या सुरू करून त्यातून पैसा कमावला आहे.मुळात तिच्या य वाहिनीत त्या कंपन्यांनी पैसे गुंतवण्याचे कारण काय?ज्या प्रमाणात पैसा गुंतवला आहे तोही अनुचित आहे. म्हणजे टीचभर वाहिनी आहे.ती चालवण्यासाठी काही लाखाची गरज आहे पण त्या कंपन्यांनी करोडो रुपये गुंतवले आहेत. नेमके हे व्यवहार होण्याच्या आसपासच या कंपन्यांना सरकारी जमिनी फार स्वस्तात प्राप्त झालेल्या असतात किवा त्यांना सरकारी कंत्राटे फुकटात मिळाल्यागत मिळालेली असतात.हा निव्वळ योगायोग नसतो.त्या वाहिनीतल्या अतिशयोक्त गुंतवणुकीतून मिळालेली रक्कम ही सरळ सरळ लाच असते. सरकारी कंत्राटे किवा जमिनी हडप करण्याच्या बदल्यात दिलेली असते.या प्रकारांतून नकळतपणे भ्रष्टाचार झालेला असतो.

कनिमोळी सारखा असाच प्रकार जगन मोहन रेड्डी यांनीही केला आहे. पद्धत तीच. नावे वेगळी.कनिमोळीच्या  ऐवजी जगनमोहन, करुणानिधीच्या ऐवजी राजशेखर रेड्डी आणि कलैग्नारच्या ऐवजी साक्षी. मामला तोच. पैसे खाण्याची रीत आणि युक्ती तीच. गंमतीचा भाग असा की  या दोघांचेही हे पितळ आताच उघडे पडत आहे. गेल्या आठवड्यात कनिमोळीचा पंचनामा झाला आता जगनमोहनचा सुरू झाला आहे. जगनमोहन रेड्डी यांनी गतवर्षी सादर के लेल्या आयकर विवरण पत्रात काही विसंगती आढळल्या आहेत. या विसंगतीत जगनमोहन याच्या जगती पब्लिकेशन या कंपनीने २००९-१० या वर्षात कंपनीला तोटा झाल्याचे दाखवले आहे. आयकर खात्याला हे मान्य नाही. या कंपनीत काही बड्या कंपन्यांनी केलेली अनाठायी गुंतवणूक त्यांनी कमाईत दाखवलेली नाही. त्या शिवाय कंपनीला काही कॅश क्रेडिट मिळाले आहे आणि त्याचे स्रोत सांगितलेले नाहीत. त्यामुळे आयकर खात्याने जगनमोहन यांच्यावर १२२ कोटी आयकर भरण्यासंबंधीची नोटीस बजावली असून त्या निमित्ताने कंपनीच्या हिशेबांची तपासणी सुरू केली आहे. निमित्त ते मिळाले असले तरीही त्यामुळे जगनमोहन रेड्डी यांच्या अवैध  कमाईची गुहा खोलली गेली आहे.
   
हे सारे प्रकार सुरू असतानाच तेलुगु देसमच्या काही नेत्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून जगनमोहन रेड्डी याच्यावर खटला भरण्याची परवानगी मागितली आहे. मनी लाँडरिंग विरोधी कायदा, हवाला मनीची प्राप्ती आणि वडलांच्या पदाचा वापर करून अर्जित केलेला काळा पैसा यावरून हा खटला भरण्याचा मनोदय काही तेलुगु देसम नेत्यांनी व्यक्त केला आहे. केन्द्र सरकार, सीबीआय आणि लाचलुचपत प्रतिबंधक खाते या कारवाई बाबत फारसे गंभीर नसल्यामुळे आपल्याला खटला भरण्याची परवानगी मिळावी असे या अर्जात म्हटले आहे.  त्याची सारी संपत्ती ही वडलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या प्रभावाखाली अनैतिक मार्गांनी मिळवलेली असल्याचा आरोप या अर्जदारांनी केला आहे. ही अनैतिक कमायी करताना सरकारी तिजोरीवर मोठा भार टाकण्यात आला असून सरकारचे नुकसान झाले आहे असे म्हणताना या अर्जदारांनी, जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या वडलांना काही कंपन्यांना काही परवाने आणि सरकारी जमिनी देण्यास  भाग पाडले आणि या उपकाराच्या बदल्यात या लोकांकडून आपल्या कंपनीचे शेअर्स घेण्यास भाग पाडून त्यातून बराच पैसा कमावला असे या नेत्यांनी म्हटले आहे. हा पैसा जगनच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या खरेदीपोटी देण्यात येत असल्याचे दाखवले गेले असले तरीही या शेअर्सचे मूल्य मनमानी लावलेले आहे.
   
जगनच्या जगती पब्लिकेशनची एकूण गुंतवणूक  ७३ कोटी रुपये आहे. ही रक्कम त्याने कोठून आणली हा तर प्रश्न आहेच पण या ७३ कोटीच्या कंपनीचे १० टक्के भाग एका कंपनीने ३०० कोटी रुपयांना घेतले आहेत. ७३ कोटी रुपये गुंतवणुकीच्या कंपनीचे १० टक्के शेअर्स ३०० कोटीला घेताना या कंपनीने काय खुलासा केला आहे ?   जगनच्या साक्षी या कंपनीची एकूण मालमत्ता ३४९ कोटी रुपये आहे पण काही नामवंत कंपन्यांनी या कंपनीत १२४६ कोटी रुपयांचे भांडवल गुंतवले आहे. या गुंतवणुकीचे विश्लेषण काही नाही. या कंपन्यांना याच काळात मिळालेले सरकारी परवाने, त्यांना मिळालेल्या स्वस्तातल्या सरकारी जमिनी हाच या गुंतवणुकीचा खुलासा आहे या कंपन्यांनी  हडप कलेल्या जमिनी करोडो रुपयांच्या आहेत आणि त्या त्यांना काही लाख रुपयांत मिळाल्या आहेत. असाच प्रकार जगनच्या काही खरेदीतही झाला आह. मंत्री रियाल्टीजच्या मालकीचे बंगलूरचे ५०० कोटीचे एक व्यापार संकुल जगनने २५० कोटीला घेतले आहे आणि या बदल्यात मंत्रीला हैदराबादजवळची १.६ कोटी रुपये प्रति एकर भावाची सरकारी जमीन केवळ काही लाखात दिली आहे. 

Leave a Comment