गोंदिया : इंग्रजी ऐवजी पोचल्या उर्दू माध्यमाच्या प्रश्नपत्रिका

गोंदिया १७ मार्च – इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चक्क उर्दू माध्यमाच्या प्रश्नपत्रिका वाटप करण्यात आल्याची घटना येथील संत तुकाराम हायस्कूल येथील इयत्ता दहावीच्या परीक्षेदरम्यान उघडकीस आली.या प्रकारात विद्यार्थ्यांना तब्बल अर्धा तास प्रश्नपत्रिका उशीरा उपलब्ध झाल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

येथील संत तुकाराम हायस्कूल येथे इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र आहे. सकाळी अकराच्या सुमारास परीक्षा सुरू होताना इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चक्क उर्दू माध्यमाच्या प्रश्नपत्रिका वाटप करण्यात येत असल्याची बाब उघडकीस आली. चार गठ्ठ्यात तब्बल चाळीस प्रश्नपत्रिका होत्या. त्यामुळे चाळीस विद्यार्थ्यांकरिता आता अतिरित्त* प्रश्नपत्रिका कुठून पुरविणार असा प्रश्न केंद्र संचालक बिसेन यांना पडला. त्यांनी तत्काळ परीक्षण अधिकारी मोटघरे यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. मोटघरे यांनी लगेच परिसरातील तीन परीक्षा केंद्रातून अतिरित्त* प्रश्नपत्रिकांची जुळवाजुळव केली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या.

दरम्यान, ही सर्व कसरत करताना विद्यार्थ्यांचा पंधरा मिनिटांचा वेळ गेला. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोटघरे आणि केंद्र संचालक बिसेन यांनी सतरा मिनिटांचा अतिरिक्त वेळ प्रश्नपत्रिका सोडविण्याकरिता दिला. मात्र हा सर्व प्रकार घडताना विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. या सर्व प्रकाराचे खापर मात्र, नागपूर येथील परीक्षा मंडळाच्या माथीच फोडावे, असे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. कारण त्यांच्याच चुकीचा भुर्दंड विद्यार्थ्यांना सहन करावा लागला आहे.

Leave a Comment