कोपरगाव : कोपरगाव पोलिसांची पत्रकारांना अर्वाच्च शिवीगाळ आणि दमबाजी

कोपरगाव १७ मार्च – कोपरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोर्यांची माहिती मागणाऱ्या पत्रकारांना कोपरगाव पोलिस ठाण्याच्या ठाणे अंमलदाराने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमबाजी केली आहे.गुन्ह्यांची माहिती न देता पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या या ठाणे अंमलदाराचा कोपरगाव व शिर्डी पत्रकार संघाने निषेध नोंदविला आहे.

कोपरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५ मार्च रोजी चोऱ्या झाल्या होत्या. याबाबतची माहिती घेण्यासाठी शिर्डीहून पत्रकार रमेश कापकर यांनी फोन केला असता माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर पत्रकार बाबा मनियार यांनी फोन केला असता माहिती पाहिजे असेल तर कोपरगाव पोलिस ठाण्यात समक्ष येऊन माहिती घ्या असे सांगण्यात आले. कोपरगावला येणे शक्य नाही. फोनवरच माहिती द्या अशी विनंती केली असता या ठाणे अंमलदाराने उर्मट भाषेत उत्तरे द्यायला सुरूवात केली. मी शिर्डीचाच आहे, असे सांगून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली. या प्रकाराची विचारणा करणार्याच सायं दैनिकाचे संपादक जितेश लोकचंदानी यांनाही त्यांनी हीच भाषा वापरली.

पोलिसांना जनतेचे मित्र संबोधले जाते. मात्र ठाणे अंमलदाराच्या उर्मटपणावरून तमाम पोलिस खात्याच्या पेशाला कलंक लावण्याचा प्रयत्न झाला आहे. अशा या उर्मट पोलिस कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी शिर्डी व कोपरगाव येथील पत्रकार संघाने केली आहे. पत्रकारांनाच जर पोलिस शिवीगाळ करू लागले तर सामान्य माणसाची काय गत असेल, अशी चर्चा नागरिकांत सुरु आहे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, यांच्यासह जिल्हा पोलिस प्रमुख कृष्णप्रकाश, अतिरिक्त पोलिस अधिक्षक सुनील कडासने, पोलिस उपअधिक्षक श्रीकांत जावळे, पोलिस निरिक्षक औटी यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

Leave a Comment