अहमदनगर : महसूल बुडविणार्या ९३ वीटभट्टीचालकांवर कारवाईचा बडगा

राहाता १७ मार्च – देर आये दुरूस्त आये, या उक्तीप्रमाणे काम करणार्याय सरकारी यंत्रणेला अचानक जाग आली आहे.राहाता तालुक्यात विनापरवाना वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणात चालविल्या जातात.महसूल विभागाचा लाखोंचा महसूल बुडविणाऱ्या ९३ वीटभट्टीचालकांवर तहसीलदार अप्पासाहेब शिंदे यांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याने व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.

राहाता तालुक्यातील पुणतांबे, न. पा. वाडी, शिंगवे, पिंपळवाडी, रुई, वाकडी, शिंगळे, हणमंतगाव आदी गावांमध्ये ११० वीटभट्ट्या असून यातील काही व्यावसायिकांनी वीटभट्टीसाठी जमीन बिगरशेती न करताच व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. या वीटभट्ट्यांमुळे प्रदूषणही होत आहे. याबाबत अनेक तक्रारी राहाता तहसीलदारांकडे आल्या होत्या. याची दखल घेत तहसीलदार शिंदे यांनी वीटभट्ट्यांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना तलाठी व मंडल निरीक्षकांना दिल्या. त्यानुसार ११० पैकी पुणतांबे येथील १७ वीटभट्टीचालकांना जिल्हाधिकारी कार्यालयाने सरकारी जमीन देऊन व्यवसाय करण्यास अधिकृत परवानगी दिली.

इतर वीटभट्टी व्यावसायिकांनी बिगरशेतीची परवानगी न घेता व्यवसाय करुन सरकारचा महसूल बुडविल्याचा आरोप आहे. या वीटभट्टीचालकांवर दंडात्मक कारवाईच्या नोटिसा तहसीलदार शिंदे यांनी बजावल्या आहेत. या ९३ वीटभट्टीचालकांकडून २७ लाख रूपये दंड वसूल करण्याची कारवाई सुरू झाली आहे. सदरच्या कारवाईमुळे वीटभट्टी व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.

Leave a Comment