सोलापूर : वाळू साठ्यांच्या लिलावातून ७ कोटींचा महसूल, बोटची परवानगी नसल्याने ठेकेदार नाराज

सोलापूर १६ मार्च – सोलापूर जिल्ह्यातील भीमा,सीना तसेच नीरा नदीतील वाळू साठ्यांच्या लिलावातून शासनास ७ कोटी ३९ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.४४ वाळूसाठ्यांपैकी केवळ १८ वाळूसाठ्यांचा लिलाव होऊ शकला तर ११ ठिकाणचा लिलाव राखून ठेवण्यात आला आहे.वाळू उपसा करण्यासाठी बोटींना परवानगी देण्यात येत नसल्याने ठेकेदारांनी लिलावावेळी नाराजी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात कडक पोलीस बंदोबस्तात वाळू लिलाव पार पडला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे, उपजिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, दक्षिण तहसीलदार दीपक वजाळे, गौण खनिज कर्म अधिकारी सचिन डोंगरे आदी उपस्थित होते. करमाळा तालुक्यातील तरटगाव येथील वाळूसाठा १५ लाख, आवाटी येथील ६ लाख ७० हजार, मिरगव्हाण येथील ९ लाख ३० हजार, कोंढार चिचोली ६ लाख ७० हजार, पंढरपूर तालुक्यातील कोंढार चिचोली येथील ९२ लाख ५० हजार, शेगाव दुमाला क्रमांक ३ चा ८६ लाख २५ हजार, माळशिरस तालुक्यातील संगम ४१ लाख ४० हजार, तिरवंडी १७ लाख ६० हजार, पळसमडळ ७२ लाख याप्रमाणे वाळू साठ्यांचे लिलाव देण्यात आले. ११ वाळूसाठ्यांचे लिलाव होऊनदेखील ते जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतरच या ११ वाळूसाठ्यांचा लिलाव देण्यात येणार आहे.

Leave a Comment