सोलापूर : बंदुकीचा धाक दाखवून सराफास लुटणाऱ्या चोरट्यांना अटक

सोलापूर १६ मार्च –  हत्तुरे वस्ती येथील किर्ती ज्वेलर्स या सराफास बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३ अट्टल चोरट्यांना झोन पथकाने जेरबंद केले.चंद्रकांत विश्वनाथ लांडगे,गुरु काशीराया पत्तार,बिरप्पा अमोगसिध्द पुजारी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.हत्तुरे वस्ती येथील किर्ती ज्वेलर्सवर २६ नोव्हेंबर २०१० रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दुकानाचे मालक शरद महादेव सोनार हे दुकानात बसले असताना मोटारसायकलीवरून ३ अज्ञात इसम आले. त्यांनी शरद सोनार यांना सोन्याची अंगठी दाखव असे सांगितले. नंतर यातील एका इसमाने बंदुकीचा धाक दाखवून हवेत गोळीबार केला व दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला.शेजारी राहत असलेल्या शरद यांच्या वडिलांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला.परंतू हल्लेखोर पसार होण्यात यशस्वी झाले होते.त्यानंतर त्यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा घडल्यानंतर झोन पथकाला मिळालेल्या माहितीवरून गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार चंद्रकांत विश्वनाथ लांडगे यास अक्कलकोट तालुक्यातील माशाळ या गावात छापा टाकून पकडण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीवरुन त्याचा साथीदार गुरु काशीराया पत्तार यास कोन्नुर येथे सापळा लावून पकडण्यात आले. या दोघांकडे गुन्ह्यात वापरलेल्या रिव्हॉल्व्हरविषयी चौकशी केली असता त्यांनी रिव्हॉल्व्हर बिरप्पा पुजारी याचेकडे असल्याचे सांगितले. पकडण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना सोडविण्यासाठी बिरप्पा सोलापुरात येत असल्याची खबर मिळाली. बिरप्पा यास सोरेगाव येथे सापळा लावून सोलापूरला येताना अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली बंदुक जप्त करण्यात आली असून सर्व आरोपींनी गुन्हा केला असल्याचे कबूल केले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त हिमतराव देशभ्रतार, पोलीस उपायुक्त राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली झोन पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. हांडे, बी. ए. जावळे, अनिल पोरे, शिवराम राठोड, गंगाधर जोगधनकर, अंबादास राठोड, पोना, मुन्ना शेख, सागर सरतापे, गवळी, विभुते, शेळके, गायकवाड, वाघमारे यांनी पार पाडली.

Leave a Comment