मुंबई १६ मार्च – भारताची अणुऊर्जा नियामक परिषद जपानमध्ये आलेल्या भूकंप आणि सुनामीच्या परिणामांचा अभ्यास करीत आहे. जपानच्या नाभिकीय स्थळांतील स्थितीवर लक्ष ठेवण्यात आले असून सर्व तांत्रिक सूचना उपलब्ध झाल्यानंतर संपूर्ण परिस्थितीवर निष्कर्ष काढला जाईल,असे परिषदेकडून सांगण्यात आले.
मुंबई : जपानमधील भूकंप आणि सुनामीच्या परिणामांचा अभ्यास
देशातील २० रिअॅक्टर्सपैकी २ रिअॅक्टर तारापूर येथे आहेत. हे रिअॅक्टर जपानच्या फुकुसिमा रिअॅक्टरसारखेच आहेत. भारतातील सर्व रिअॅक्टर भूकंप आणि सुनामीरोधी तयार करण्यात आलेले आहेत. सुरक्षा प्रक्रियेचा एक भाग म्हणून तारापूर प्रकल्पातील सर्व जुन्या संयंत्राचे निरीक्षण करण्यात आले आहे. या निरीक्षणाच्या आधारे आणीबाणीच्या वेळी वीज पुरविण्यासाठी अतिरिक्त डिझेल जनरेटर व आणखी काही उपाय योजण्यात आले आहेत. भारतातील सर्व संयंत्रे सुरक्षित स्थळी आहेत. तसेच सर्व प्रकारच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी अनेक आपातकालीन योजना तयार करण्यात आल्या आहेत, असे अणुऊर्जा नियामक परिषदेकडून सांगण्यात आले. जपानमधील घटना डोळ्यासमोर ठेवून भारतातील संयंत्रांच्या सुरक्षा उपायांची चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहितीही परिषदेकडून देण्यात आली.
