पंढरपूर १६ मार्च – देशामध्ये जीवनावश्यक वस्तुंची दरवाढ होत आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे.भ्रष्टाचार वाढल्यामुळे कोट्यावधी रूपये परदेशात गुंतविले जात आहेत.या विरोधात आवाज उठविण्यासाठी ७ एप्रिल रोजी दिल्ली येथे संसदेवर अखिल भारतीय ग्राहक पंचायती वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे,अशी माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ पोफळी यांनी दिली.अ.भा.ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय शिबीर बडोदा (गुजरात) येथे झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना पोफळी बोलत होते.
यावेळी महामंत्री सोमनाथ खेडकर, गुजरातचे अन्न नागरी पुरवठा व संरक्षण मंत्री नरोत्तमभाई पटेल, पंढरपूर येथील ग्राहक पंचायतीचे शरदचंद्र घळसासी, पी. आय. कोळी, सुरेश लाड उपस्थित होते. ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक राज्यात स्वतंत्र ग्राहक मंत्रालय असावे असे सांगून राजाभाऊ पोफळी म्हणाले, भ्रष्टाचार वाढल्यामुळे देशातील कोट्यावधी रूपये परदेशात ठेवले जात आहे. यामुळे देशाचा विकास खुंटत आहे. याविरोधी जनआंदोलन उभे करण्यात येणार आहे. ७ मार्च रोजी काढण्यात येणार्याा मोर्चामध्ये कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. नरोत्तम पटेल म्हणाले की, ग्राहक पंचायतीचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांचे कार्य ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावात शाखा निर्माण व्हावी. त्यामुळे गैरव्यवहाराला आळा बसेल. गुजरातमध्ये सर्वप्रथम ग्राहक मंत्रालय उभे करण्यासाठी प्रयत्न केले जातील. २ दिवस चाललेल्या शिबीरामध्ये अनेक पदाधिकार्यां नी आपला अहवाल सादर केला. यावेळी २५ प्रांताचे प्रतिनिधी उपस्थित होते.