औरंगाबाद : मराठवाड्यातील उन्हाचा तडाका वाढला !

औरंगाबाद १६ मार्च – मागील आठ दिवसापासून हिगोली शहरासह जिल्ह्यातील तापमानात वेगाने वाढ झाली असून दुपारच्यावेळी उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिकांना दैनंदिन काम करणे कठीण होऊन बसले आहे.उन्हाचा परिणाम शेतातील कामावर परिणाम होत आहे.हिंगोली,परभणी,नांदेड येथे उष्णता मराठवाड्यातील इतर ठिकाणांपेक्षा जास्त असते. या भागात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. पहाटे थंडी आणि सकाळी दहापासून उकाड्याला सुरूवात असे वातावरण मराठवाड्यात आहे.

लातूर जिल्ह्यातील पारा ३६ अंशापर्यंत पोहोचला असल्याने रस्त्यावर टोप्या, टरबूज व शीतपेयांची दुकाने थाटली गेली आहेत. दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून उन्हाळ्याला सुरुवात होते. यावर्षीदेखील तापमानाचा पारा वाढला आहे. शहरातील गांधी चौक, अंबाजोगाई रोड, औसा रोड आदी परिसरात गरिबांचे फ्रिज म्हणून ओळखले जाणारे माठ विक्रीस ठेवण्यात आले आहेत. वाढत्या महागाईप्रमाणे या माठाची गतवर्षीपेक्षा अधिक किमत असल्याने गरिबांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. व्यवसायिकांनी आपल्या दुकानाच्या दर्शनी भागात विविध प्रकारच्या टोप्या, गमचे तर रस्त्याच्या कडेला टरबूज वगैरे हातगाडे थाटले आहेत.

हॉटेल व्यावसायिकांनी आपापल्या हॉटेल्समध्ये शीतपेये व थंड खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवलेले दिसत आहे. शहरातील चौका – चौकात, गार्डन, शाळा आणि महाविद्यालयासमोर आईस्क्रीमचे दुकान, रसवंती, विविध फळाच्या ज्युसचे सेंटर्स थाटली असून त्यातून नागरिक आपली तात्पुरती तहान भागवून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Leave a Comment