मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन विधिमंडळात गदारोळ

मुंबई १५ मार्च – केंद्रीय दक्षता आयोगाच्या आयुक्तपदी पी.जे.थॉमस यांच्या नियुक्ती प्रकरणी दिशाभूल करणारे पंतप्रधान कार्यालयाचे तत्कालीन राज्यमंत्री आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माफी मागावी अन्यथा नैतिक जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी मंगळवारी विधानसभेत लावून धरली.हौद्यामध्ये उतरुन विरोधकांनी गोंधळ घातला. सदर प्रश्न केंद्राचा असल्याने विधानसभा अध्यक्षांनी चर्चा उपस्थित करण्यास अनुमती नाकारली. त्यामुळे विरोधकांनी कामकाजात अडथळा निर्माण केला.अखेर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी नियम ५७ अन्वये केंद्रीय दक्षता आयोगाच्या आयुक्तपदी थॉमस् यांची नेमणूक केल्याबाबतचा वादग्रस्त मुद्दा उपस्थित केला. परंतू हा विषय राज्याच्या अखत्यारित येत नाही असे सांगत विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी त्यांना परवानगी नाकारल्याने अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते खडसे यांच्यात काही क्षण शाब्दीक चकमक उडाली. सदर विषय केंद्र सरकारचा असल्याने कुठल्याही नियमान्वये तो विधानसभेत उपस्थित करता येणार नाही, असे अध्यक्षांनी खडसेंना सुनावले. यानंतर खडसे संतप्त झाले.

विरोधकांनी ५७ ची नोटीस द्यायची नाही, कपात सूचना करायच्या, महत्त्वाचे प्रश्न विचारु द्यायचे नाहीत, असा संतप्त सवाल करीत केंद्रीय दक्षता आयोगाचा राज्य सरकारशी कसा संबंध आहे हे सांगण्याचा प्रयत्न खडसे यांनी केला. यावेळी झालेल्या गोंधळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज तासभरासाठी तहकूब केले. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु होताच ‘मुख्यमंत्री राजीनामा द्यावा’ अशा घोषणा देवून विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. शिवसेना-भाजपा आणि मनसेसह सर्वच विरोधी पक्षाचे सदस्य घोषणा देत होते. सभागृहात उपस्थित असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शांतपणे विरोधकांचा गोंधळ पाहत होते.

खडसेंनी स्थगन प्रस्ताव वाचण्यात सुरुवात करताच सत्तारुढ पक्षाचे सदस्य हौद्यात येवून विरोध करीत होते. नंतर विरोधकांनीदेखील घोषणाबाजी सुरु केली. घोषणाबाजीमुळे विधानसभा अध्यक्षांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले. पी. जे. थॉमस नियुक्ती प्रकरणात पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री असताना पंतप्रधानाची दिशाभूल केली. थॉमस यांच्यासंबंधी केरळ सरकारने दिलेला अहवाल चव्हाण यांनी लपवून ठेवला, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी अन्यथा विरोधी पक्ष चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरेल, असे खडसे यांनी नंतर पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Comment