मुंबई : जयराज फाटकांच्या घरांवर सीबीआयचे छापे

मुंबई १५ मार्च – आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्याप्रकरणी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी जयराज फाटक यांच्या मुंबई, पुणे आणि नवी दिल्लीतील घरांवर मंगळवारी सकाळी सीबीआयने छापे घातले.सीबीआयला छाप्यादरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

आदर्श घोटाळ्याची सीबीआयकडून चौकशी केली जात असून आतापर्यंत १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपल्या पदाचा गैरवापर करुन आदर्श सोसायटीच्या बांधकामाला परवानगी दिल्याचा आरोप फाटक यांच्यावर करण्यात आला आहे. आदर्श घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला होता. जयराज फाटक हे १९७८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. संयुक्त सचिव दर्जाच्या अधिकार्या्ची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. सीबीआयने तशी परवानगी घेऊन फाटक यांच्या विविध ठिकाणांवर छापे टाकले. आदर्श सोसायटीमध्ये ज्या लोकांना फ्लॅटची लॉटरी लागली, त्यामध्ये जयराज फाटक यांचे सुपूत्र कनिष्क यांचाही समावेश आहे

Leave a Comment