पुणे दि १५ – पुणे महानगरपालिकेने हाती घेतलेल्या अनेक कामांचा फटका बीएसएनएला बसत असून त्यांच्या किमान १० टक्के टेलिफोन लाईन्स कायमच बंद राहात आहेत.
पुणे महानगरपालिकेने हाती घेतलेल्या अनेक कामांचा बीएसएनएला फटका
याविषयीची सविस्तर माहिती अशी की पुणे महापालिका कंत्राटदारांकडून जी कामे करून घेते ते कंत्राटदार रस्ते खोदाईसाठी जेसीबीचा वापर करतात आणि त्यामुळे बीएसएनएलच्या टेलिफोन केबल तुटतात. १ केबल तुटली तर त्यावरचे ५०० ते १००० फोन ताबडतोब डेड होतात. दररोज अशा प्रकारे केबल तुटल्याच्या किमान ७ ते ८ तक्रारी येतात. परिणामी बीएसएनएलचे १० टक्के फोन कायमच डेड असतात.
सध्याही पुण्यात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. मार्च अखेरी ही कामे पूर्ण करण्याची महापालिकेला निकड आहे. त्यात रस्ते डांबरीकरण, काँक्रीटीकरण, जलवाहिन्या बदलणे, जलनिसाःरण वाहिन्यांची दुरूस्ती अशी अनेक कामे केली जात आहेत. ही कामे मिळालेले कंत्राटदार खोदाईसाठी सर्रास जेसीबीचा वापर करत असतात. जेसीबीचा चालक उंचावर असल्याने खाली त्याला केबल तुटते का दगड ढकलला जातो हे कांहीच कळत नाही मात्र त्याचा फटका बीएसएनएला सोसावा लागतो आहे. विशेष म्हणजे या तुटलेल्या केबलची दुरूस्ती करायची तर त्यासाठी महापालिकेकडे परवनगीचा अर्ज करावा लागतो आणि परवानगी मिळाल्यावरच दुरूस्ती करता येते.
बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक विनोदकुमार महेंद्रा म्हणाले की आत्ताच वडगांव शेरी भागातील ४ हजार तर सेनापती बापट रोडवरील १५०० फोन यामुळे बंद आहेत.गेल्या दहा दिवसांत शहराच्या अनेक भागातून फोन बंद असल्याच्या तक्रारी वाढत्या प्रमाणावर येत आहेत. वास्तविक नियमानुसार महापालिकेच्या कामामुळे केबल तुटली असेल तर त्याची नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे मात्र महापालिकेकडे तशी मागणी केल्यास ते उलट कुणाच्या परवानगीने केबल टाकली अशी विचारणा करतात. वास्तविक इंडियन टेलिग्राफ कायद्यानुसारच या केबल टाकल्या जात असतात. मात्र महानगरपालिका आपल्या कंत्राटदाराकडून वसुली करत नाहीतच पण स्वतःही देत नाहीत. त्यामुळे आम्हाला ग्राहकांना सेवा देण्यात अडचणी येतातच पण आमचा दरवर्षी पाच कोटींचा महसूलही बुडतो. या केबल वारंवार तुटल्या तर त्यांची क्षमता कमी होते.वास्तविक एका केबलचे लाईफ वीस वर्षांचे असते पण वारंवार तुटल्या तर ते पाच वर्षांवरच येते.
बीएसएनएलची फोन बरोबरच ब्रॉडबँड सेवा घेणार्यांयनाही त्यामुळे नुकसान सोसावे लागते व त्यांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होतो असे सांगून ते म्हणाले की आजकाल अनेक शैक्षणिक संस्था ऑनलाईन परिक्षा घेतात. केबल तुटल्या तर त्यांनाही अडचणीचे होते व परिणामी अशा संस्था व व्यावसायिक अन्य कंपन्यांची सेवा घेण्याकडे झुकतात. परिणामी आमची ग्राहकसंख्याही घटते.
विशेष म्हणजे ज्या ठिकाणची केबल तुटते, त्या केबलवर पोलिस, अग्नीशमन दल, रूग्णालये अशा अत्यावश्यक सेवा पुरविणार्या् संस्थांचाही समावेश असतो. त्यांचे फोन बंद झाले तर सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा त्रास सोसावा लागतो मात्र वारंवार विनंती करूनही महापालिकेकडून त्याबद्दल कांहीच प्रतिसाद दिला जात नाही.
