मुंबई : आशियातील समस्यांमुळे गुंतवणूकदार धास्तावले

मुंबई १४ मार्च वाढत्या महागाईची चिंता, पश्चिम आशियातील राजकीय अस्थैर्य, जपानवरील नैसर्गिक आपत्ती यामुळे जागतिक बाजारपेठांतील गुंतवणूकदार धास्तावले आहेत. गुंतवणुकदारांनी विकसनशील देशांतून सुमारे २१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक काढून घेतली आहे. आंतरराष्ट्रीय  बाजारात गुंतवणुकीवर नजर ठेवणाऱ्या ईपीएफआर या कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत गुंतवणुकदारांनी २१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक काढून घेतली आहे. २००८ च्या तिसऱ्या तिमाहीनंतर आता इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक काढून घेण्यात आली आहे.

या अहवालानुसार जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांमध्ये राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आता महागाई, व्याजदर व आर्थिक वृध्दी याचा अंदाज बदलत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये भारत आणि चीनसह अनेक विकसनशील देशांमध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे अगोदरच नाजूक स्थितीत असलेल्या अर्थव्यवस्था पुन्हा ट्रेकवरून  उतरण्याची भीती निर्माण झाली आहे. या अहवालात मात्र भारतातून किती पैसा काढून घेण्यात आला, याची माहिती देण्यात आलेली नाही.

सेबीजवळ असलेल्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी जानेवारी ते मार्च या काळात २ अब्ज डॉलर्सची रक्कम काढून घेतली आहे. यापूर्वी २०१० मध्ये परकीय गुंतवणूकदार संस्थांनी २९ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक भारतात केली होती. महागाई, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि घोटाळ्यांमुळे हैराण असलेल्या भारतातही गुंतविण्यास परकीय गुंतवणूकदार घाबरत असल्याचे सध्या चित्र आहे.

Leave a Comment