नागपूर : संगीताला साचलेपणातून बाहेर काढले – अजय – अतुल

नागपूर १४ मार्च मराठी संगीतात एक प्रकारचा साचलेपणा आला होता. लोकसंगीत जवळजवळ संपले होते आणि लोक भावसंगीतालाच संगीत समजले जात होते. त्यातून आलेल्या साचलेपणातून आम्ही मराठी संगीताला बाहेर काढले, असे सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी सांगितले. ई-टीव्ही मराठीवरील गौरव महाराष्ट्राचा या संगीत स्पर्धेच्या ऑडिशनसाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

अजय-अतुल पुढे म्हणाले की, भावगीत आणि भावसंगीताभोवती मराठी संगीत फिरत होते. भावसंगीत म्हणजेच संगीत असे समीकरण झाले होते. लोकसंगीत विस्मरणात गेले होते. आम्ही पहिल्यांदाच एखाद्या संगीत स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम करीत आहोत. या स्पर्धेतून चांगले गुणवान गायक शोधण्याचा आमचा प्रयत्न राहील. आज जवळपास प्रत्येक चॅनेलवर संगीताचा रिअॅलीटी-शो आहे. त्यामुळे गाण्याची प्रचंड क्रेझ आहे. पण मुलांनी केवळ शोमध्ये झळकण्यापुरते मर्यादित न राहता त्यानंतरही मेहनत घेणे आवश्यक आहे. स्पर्धेदरम्यान आम्हाला एखादा गुणी गायक आढळला तर स्पर्धेच्या निकालाची वाट न पाहता आम्ही त्याला संधी देऊ असे दोघांनी स्पष्ट केले. स्पर्धेत भाग घेऊन फार तर चमकता येईल. पण, पुढे टिकण्यासाठी आवाजात दम पाहिजे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्या त गुणवत्ता आहे. या गुणवत्तेचा शोध घेण्याचा आमचा प्रयत्न राहील असे ते म्हणाले. लोक रिमिक्स का करतात हेच कळत नाही. त्यापेक्षा त्यांनी ओरिजिनल ऐकावे. सर्व गाणी एकाच बीटवर असती तर संगीत देण्याचा खटाटोप तरी कशाला झाला असता, असा सवाल अजय-अतुल यांनी केला.

Leave a Comment