वाटाघाटीचा खरा मुद्दा काय….

तामिळनाडूत विधानसभेच्या निवडणुकीतल्या जागावाटपावरून काँग्रेस आणि द्रमुक यांच्यात वाद झाला. काय होता हा वाद ? द्रमुक पक्ष काँग्रेसला ६० जागा सोडावयास तयार होता  आणि काँग्रेसला ६३ जागा हव्या होत्या. वाद होता ३ जागांचा.२३४ जागांच्या विधानसभा निवडणुकीत केन्द्रातील सरकार मध्ये असलेले दोन पक्ष भांडतात आणि त्यावरून एक पक्ष चक्क सरकारमधून बाहेर पडतो. एवढ्या किरकोळ कारणावरून या पक्षात एवढा मोठा वाद होतो यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. गंमतीचा भाग असा की जो पक्ष काहीही झाले तरी जादा तीन देणार नाही, सरकार पडले तरीही हरकत नाही, असा निकरावर आलेला असतो तो पक्ष शेवटी तीन जादा जागा देतो. यासाठी द्रमुक पक्षाचे तीन ज्येष्ठ नेते दिल्लीत येतात. त्यांच्या सोनिया गांधी यांच्याशी तीन आणि अन्य नेत्यांशी दोन दोन बैठका होतात. हे सगळे वरवर दाखवले जात आहे. तीन जागांची चिंता करावी अशी या दोन्ही पक्षांची स्थिती नाही. दोन पक्षांची युती टिकावी आणि ती मोडू नये यासाठी या दोघांनीही बरेच त्याग केलेले आहेत मग केवळ तीन जागांसाठी ते एवढा उपद्व्याप करतील असे वाटत नाही. तीन जागांचा वाद आहे असे वरवर दाखवले जात आहे. आत दुसर्यागच कोणत्या तरी कारणावरून वाटाघाटी झालेल्या आहेत असे वाटते.

असे वाटावे अशी सारी स्थितीही आहे. कारण या दोन्ही पक्षांना २ जी स्पेक्ट*म घोटाळ्याने घेरलेले आहे. या भ्रष्टाचाराचे खापर द्रमुक वर फोडण्यास काँग्रेस उत्सुक आहे. तसे झाले म्हणजे भ्रष्टाचार झाला पण काँग्रेस पक्ष त्यापासून दूर आहे अशी बतावणी करता येते. म्हणून ए. राजा यांनी हात मारला आहे अशी जनतेची खात्री होताच  काँग्रेस नेत्यांनी त्यांना दिलेले संरक्षण काढून घेतले. हा सारा प्रकार द्रमुकसाठी मात्र तापदायक ठरला आहे कारण विधानसभेची निवडणूक जवळ आली असतानाच ही पीडा समोर आली आहे. आता ए. राजा प्रकरणातून  नव नवे धुमारे फुटायला लागले आहेत आणि त्यांचे लोण करुणानिधी यांच्या कुटबापर्यंत पोचायला लागले आह. कारण २ जी स्पेक्ट्रम मध्ये राजा ने जी मनमानी केली आहे तिच्यात अनेक गुन्हेगार जवळ केले आहेत. स्पेक्ट्रम घोटाळ्यातले परवाने स्वस्तात लाटणारांनी आता आपण या बदल्यात करुणानिधी यांच्या कुटुंबाला दिले असल्याचे सांगितले आहे आणि त्यामुळे २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करताना करुणानिधी यांची खासदार कन्या कनिमोझी हिचा नंबर लागण्याची शक्यता आहे.
   
केवळ कनिमोझी यांचीच विचारपूस करून भागणारे नाही. करुणानिधी यांची द्वितीय पत्नी दयालू अम्मल यांनाही चौकशीला सामोरे जावे लागेल. कारण त्याही या काळ्या पैशाच्या लाभार्थी आहेत. तसे झाले तर करुणानिधी यांना आपल्या राज्यातल्या मतदारांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आपण ज्याचा उल्लेख कलैगनार असा केला तो नेता खरा क्रांतिकारी नसून बेमुर्वतखोर पणाने पैसे खाणारा आहे अशी प्रतिमा ऐन निवडणुकीत झाली तर करुणानिधींच्या पक्षाचा पराभव ठरलेलाच आहे. हे संकट टळावे यासाठी करुणानिधींनी  वाटाघाटीत ३ जागांवरून वाद होत असल्याचा देखावा केला होता. आतून या दोघींची चौकशी होऊ नये हीच त्यांची मागणी होती. असे असले तरीही सोनिया गांधी यांनी ही मागणी मान्य केलेली नाही.
 
आता ही चौकशी न्यायालयाच्या अधिपत्याखाली सीबीआय च्या हातून सुरू आहे. ती करावी की नाही याची सूत्रे आता आपल्या हातात नाहीत असे म्हणून सोनिया गांधी यांनी द्रमुकला नाकारले आहे. मात्र या अटीवर आपल्या वाटाघाटी फिसकटल्या आहेत अशी आपली प्रतिमा होऊ नये याची काळजी द्रमुकने घेतली आहे आणि काँग्रेसलाही सावध व्हावें लागले आहे. कारण आपण जागावाटपात जादा जागा मिळाव्यात म्हणून द्रमुकला कनिमोझीची चौकशी न होण्याची सवलत दिली आहे असे दिसणे काँग्रेसलाही महागात पडणारे आहे. त्यामुळे युतीही होणार आहे आणि कनीमोझीसह दयालू अम्मलची चौकशीही हेणार आहे. 

Leave a Comment