जपानमध्ये भूकंपापाठोपाठ त्सुनामीचाही हैदोस

टोकियो दि ११ जपानला शुक्रवारी दुपारी महाप्रलयंकारी भूकंपाचा धक्का बसला असून भूकंपापाठोपाठ त्सुनामीच्या लाटांनीही जपानमध्ये हैदोस माजविला आहे.जपानी वेळेनुसार दुपारी अडीच च्या सुमारास बसलेल्या या धक्क्यांची तीव्रता ८.९ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे.भूकंपानंतर समुद्रात  दहा मीटर उंचीच्या त्सुनामी लाटा उसळल्या आणि त्यामुळे जपानभर हाहाकार माजला आहे. समुद्राचे पाणी इशान्येकडील शहरात घुसले असून अक्षरशः लाखो लोक या नैसगिक संकटात सापडले आहेत. भूकंपात आत्तापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३५ वर गेली असून प्रत्यक्षात हा आकडा अधिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जपानची राजधानी असलेल्या टोकियोपासून ४०० किमीवर असलेल्या मियागी शहराजवळ भूकंपाचा केंद्रबिदू होता. १९९५ नंतरचा हा सर्वात मोठा भूकंप असून त्याची तीव्रता जपानच्या इशान्य भागात अधिक आहे. या भागातील अनेक शहरात आगी लागल्या असून तेल रिफायनरीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. इमारती आणि घराची दुर्दशा झाली असून वीजपुरवठा आणि टेलिफोन तसेच वायरलेस सेवा ठप्प झाल्याने मदतकार्योत अडथळे येत आहेत. इमारतींच्या छपरावर अनेक लोक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मेट्रो रेल्वेही बंद झाल्या आहेत मात्र जपानमधील पाची अण्विक केंद्रे सुरक्षित असल्याचे समजते.

भूकंपापाठोपाठ उसळलेल्या त्सुनामीच्या महाप्रचंड लाटांमुळे हे संकट अधिक गहिेरे बनले आहे. सुमारे १००० मीटर आतपर्यंत सम्रुद्राचे पाणी घुसले असून १३ ते १५ फूट उंचीच्या लाटा उसळत आहेत. अनेक घरे या पाण्यात वाहून गेली अनेक घरे पाण्याचे वेढली गेली आहेत.घरांच्या छपरांवर नागरिकांनी आश्रय घेतला आहे. त्सुनामीमुळे अनेक वाहनेही वाहून गेली आहेत तर महाप्रचंड बोटीही उलटल्या आहेत. जपान सरकारने नैसर्गिक आपत्ती जाहीर केली असून पंतप्रधानांनी खास टास्क फोर्सची घोषणा केली आहे. जपानला अजूनही बारीकबारीक भूकंपाचे धक्के जाणवत असून त्यामुळेही मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. या भूकंपात अब्जावधी रूपयांची वित्तहानी झाली असावी असा प्राथमिक अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
 
जपानमध्ये झालेल्या या भूकंपामुळे भारताला त्सुनामीचा धोका नसल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी जपानशेजारील १९ देशांना त्सुनामीचा धोका असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. रशिया, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, दक्षिण अमेरिकेसह संपूर्ण पॅसिफिकच्या किनारी भागाला त्सुनामी येण्याची शक्यता अमेरिक न त्सुनामी नियंत्रण विभागाने वर्तविली असून जपानपाठोपाठ त्सुनामीचा दणका तैवानला मोठ्या प्रमाणावर बसेल असा अंदाज देण्यात आला आहे.

टोकियोतही भूकंपानंतर लोक रस्त्यावर आले असून येथेही अनेक इमारतींना आगी लागल्या आहेत.
इंडोनेशियाच्या भूकंप नियंत्रण विभागाने  पूर्व इंडोनेशियातील पामुआ व मोलुकास या भागात त्सुनामीच्या लाटा ११ जीएमटीला येण्याची शक्यता वर्तविली असून तैवान केंद्रीय हवामान संस्थेने उत्तर पूर्व किनार्या वर दुपारी साडेतीनच्या सुमारास त्सुनामी धडकण्याची शक्यता वर्तविली आहे. किनारपट्टीजवळील नागरिकांना सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला आहे. हवाई किनारपट्टीला त्सुनामी सहा वाजता येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून न्यूझीलंडला १०.५० मिनिटे, ऑस्ट्रेलियाला११ वा.१५ मिनिटांनी त्सुनामीचा तडाखा बसेल असा अंदाज आहे.

युनायटेड नेशन्सने तीस आंतरराष्ट्रीय शोध व सुटका पथके तयार ठेवली असून जरूरीप्रमाणे ती जपानला रवाना करण्यात येणार आहेत

Leave a Comment