मुंबई : डॉ. जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

मुंबई ८ मार्च – महाराष्ट्र शासनाचा वर्ष २०१० चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांना देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी येथे केली. पाच लाख रुपये रोख, शाल-श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्यातील क्रीडा, कला, साहित्य, विज्ञान, आरोग्य सेवा, सामाजिक प्रबोधन, पत्रकारिता, लोकप्रशासन इत्यादी क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने १९९७ पासून गौरविण्यात येते.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासंदर्भात शासनाने नियुक्त केलेल्या निवड समितीची बैठक सोमवारी मंत्रालयात झाली, त्यावेळी मुख्यमंत्री चव्हाण यांनी या पुरस्काराची घोषणा केली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे, निवड समितीचे सदस्य माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, क्रिकेटपटू अजित वाडेकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव आनंद कुळकर्णी, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक दिलीप शिदे उपस्थित होते.

डॉ. नारळीकर यांचे गेली ४० वर्षांहून अधिक काळ अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रात संशोधन सुरु आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्रज्ञ समजावे, यासाठी मराठीसह हिदी, इंग्रजी या तिन्ही भाषांत त्यांनी विज्ञान साहित्य, कथा, लेखांची निर्मिती केली आहे. या त्यांच्या कार्यासाठी युनेस्कोने कलिगा पुरस्कार देऊन गौरविले होते, त्याचप्रमाणे केंद्र शासनातफर्े पद्मभूषण आणि पद्मविभूषण या राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. यापूर्वी पु. ल. देशपांडे, लता मंगेशकर, सुनील गावस्कर, डॉ. विजय भटकर, सचिन तेंडुलकर, पंडित भीमसेन जोशी, डॉ. अभय व डॉ. राणी बंग, बाबा आमटे, डॉ. रघुनाथ माशेलकर, रतन टाटा, रा. कृ. पाटील, मंगेश पाडगावकर, नानासाहेब धर्माधिकारी, श्रीमती सुलोचना यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Leave a Comment