दाउद इब्राहिमचा हस्तक इक्बाल दाढी यांस अटक

पुणे दि. ८ – पुण्याच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने आसिफ इक्बाल शेख उर्फ इक्बाल दाढी आणि त्याचा साथीदार नितीन सुर्वे उर्फ आरडीएक्स या दोघांना पिपरीत अटक केली. दाढी हा दाऊद इब्राहिमच्या टोळीतील असल्याचे सांगून खंडण्या उकळत होता. मात्र तो मेघनाथ शेट्टी टोळीशी सबंधित होता. दाढी हा पिपरी एमआयडीसी येथे राहात होता तर सुर्वे हा अप्पर इंदिरानगर येथे राहात होता. गेले काही दिवस ते दोघेही फरारी होते.

दाढी आणि सुर्वे पिपरीत येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यावर पोलिस निरीक्षक सतीश गोवेकर यांनी त्यांच्या साथीदारांसह सापळा रचून या दोघांनाही अटक केली. त्यांच्याजवळून देशी रिव्हॉल्व्हर आणि एक क्रूड पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. हे दोघेही २००७ साली झालेल्या  अपहरण आणि खूनप्रकरणातील आरोपी आहेत.

दाढी हा खरोखरच दाऊद गँगशी संबंधित आहे, का तो केवळ त्याच्या नांवाचा उपयोग करून घेतो आहे हे आत्ताच सांगणे कठीण असल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अनंत शिदे यांनी सांगितले. मात्र दाढी हा बंदी असलेल्या कुप्रसिद्ध सिमी संघटनेचा सदस्य असावा असा मात्र दाट संशय आहे. दाढीवर अनेक गुन्हे दाखल असून त्यात खून, खंडणी, खुनाचा प्रयत्न, अपहरण अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. दाढी हा अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असतानाच त्याचा मेघनाथ शेट्टीच्या मुलाशी संबंध आला. दाढी याने पिंपरी औद्योगिक वसाहतीत व्यायाम उपकरणांचे युनिटही काढले होते. बाबा भोसले गँग विरोधात तो ९० सालीच मेघनाथ शेट्टीकडून सामील झाला होता.

नितीन सुर्वे उर्फ आरडीएक्स हा शार्प शूटर म्हणून प्रसिद्ध असून पर्वतीत २००२ साली झालेल्या नवनाथ वाडकर खूनप्रकरणात त्याला २००५ साली जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मात्र तेव्हापासून तो फरारीच होता असे पोलिसांनी सांगितले. या अटकसत्रात निरीक्षक सतीश गोवेकर यांच्यसोबत सतीश कांबळे, नासीर पटेल हे निरीक्षक तसेच हवालदार अरूण बुधकर, पोपट गायकवाड, विलास पाळंदे आणि गनी सय्यद हेही सहभागी झाले होते.

Leave a Comment