नवी दिल्ली : विमान कंपन्यांचा वाढीव सेवा कराला विरोध

नवी दिल्ली, ६ मार्च — केंद्रीय अर्थसंकल्पात विमान प्रवासावरील सेवा करात वाढ करण्याची घोषणा वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केली हती. या प्रस्तावित करवाढीला देशातील विमान कंपन्यांबरोबरच जागतिक स्तरावरील विमान कंपन्यांनी विरोध केला आहे. आयएटीए या संघटनेने असे वाढीव कर सदर उद्योगासाठी मारक असल्याचे सांगितले आहे.

जागतिक बाजारातील क्रूड तेलाचे दर वाढल्याने आधीच विमान प्रवास महाग होत चालला आहे. अशा परिस्थितीत सेवा करात वाढ करण्यात आली तर सर्वसामान्य लोकांना विमान प्रवास करणे परवडणार नाही. दक्षिण आफ्रिका आणि आईसलँड या देशांनी गेल्या काही महिन्यांत विमान प्रवासावरील करांत वाढ केली आहे. ब्रिटन, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील विमान प्रवासदेखील करवाढीमुळे महागला आहे. अर्थव्यवस्थेत हवाई वाहतूक उद्योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. किमतीत होणारी चढ-उतार या उद्योगासाठी संवेदनशील ठरते, असे आयएटीएचे महासंचालक जिवोन्नी बिसिगनानी यांनी सांगितले.

Leave a Comment