स्मरण शिवछत्रपतींचे

छत्रपती शिवाजी महाराज ही एक अशी विभुती होऊन गेली आहे की, जिचे चरित्र वाचून माणसाने जगावे तरी कसे जगावे हे लक्षात यायला लागते. जन्माला येऊन केवळ मरेपर्यंत जगायचे अशा निर्हेतूक पद्धतीने जगणारे लोक तर अनेक आहेत, परंतु केवळ स्वतःसाठी न जगता चार लोकांचे कल्याण करणारे आयुष्य व्यतित करावे आणि कुत्र्या-मांजराप्रमाणे केवळ नैसर्गिक प्रवृत्तींच्या उपशमासाठी सारी हयात खर्ची करण्यापेक्षा बुद्धीला साक्षी ठेवून, विवेकाला साद घालून मनुष्य जन्माचे सार्थक होईल असे जीवन जगावे ही प्रेरणा जागी करण्याचे ताकद छत्रपतींच्या चरित्रामध्ये आहे. शिवाजी महाराज किती ग्रेट होते हे वारंवार सांगण्याची गरज आहे. कारण आज माणूस आत्मकेंदिा्रत जीवन जगायला लागला आहे. त्याची ही आत्मकेंद्रितता कमी करून त्याला समाजाभिमुख केले नाही तर आपले सामाजिक जीवन पाशवी पातळीवर आल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती वाटायला लागली आहे. शिवाजी महाराजांनी आदिलशाहच्या पदरी राहून तलवार गाजवली असती आणि वतन, जहागिरी यांची प्राप्ती करून जीवन आरामदायी केले असते तर ते त्या काळची पद्धतीला धरूनच झाले असते. परंतु तो मार्ग न पत्करता आदिलशाहच्या जुलूम, जबरदस्तीला आव्हान देऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पण मांडला.


स्वराज्याची निर्मिती ही केवळ लढाई करून होणारी नव्हती. तर ती माणसांची मने जागी करून होणार होती. कारण स्वराज्य ही केवळ राजकीय कल्पना नव्हती, तिला एक सामाजिक आशय होता. त्या आशयामध्ये राज्य जनतेचे होते, बादशहाचे नव्हते आणि सुलतानाचे तर नव्हतेच पण ते शिवाजी महाराजांचे सुद्धा नव्हते. ते रयतेचे राज्य होते. त्यामुळे रयतेचा स्वराज्यावर फार जीव होता. त्यांना हे राज्य आपलेच आहे असे वाटत होते. शिवाजी महाराजांचा चितनातून ही संकल्पना साकार झाली होती आणि ती लोकांना समजून सांगण्यासाठी शिवाजी महाराज आपल्या वर्तनाने काही धडे घालून देत होते. त्यांचे वागणे, बोलणे, राज्य करणे आणि रयतेवर प्रेम करणे या गोष्टी त्या काळच्या राज्यकर्त्यांपेक्षा पूर्णपणे आगळ्यावेगळ्या होत्या. शिवाजी महाराजांचे राजे असणे हे त्या काळात अगदी असामान्य असे होते. म्हणूनच त्या काळी अनेक राजे झालेले असून सुद्धा रयतेने देवाचा अवतार हा मान केवळ शिवाजी महाराजांनाच दिलेला होता.


अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये शिवाजी महाराजांनी त्या काळात आदर्श घालून दिलेले होते. त्या काळच्या राज्यकर्त्यांची जुलमी अशी प्रतिमा निर्माण झालेली असे. गोरगरीबांच्या सुंदर पोरी-बाळी केवळ आपल्या भोगासाठी जन्माला आलेल्या आहेत असा त्यांचा पक्का समज झालेला असे. त्यामुळे कोणा गरिबाच्या मुलीवर एखाद्या तालेवाराची नजर पडली की, ती मुलगी त्यांची भोगदासी होत असे. अशा अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्याची कसलीही सोय त्या काळात नव्हती. राज्यकर्ते, बादशहा आणि जहागीरदार यांच्या नाटक-शाळा आणि जनानखाने अशा असहाय्य महिलांनी खचाखच भरलेले असत. अशा या बजबजपुरीमध्ये जनानखाना नसणारा राजा म्हणून शिवाजी महाराज लोकांच्या आदरास पात्र होत असत. शिवाजी महाराजांचे चारित्र्य हे पराकोटीचे पवित्र होते. त्यामुळे रयतेला तर त्यांच्याविषयी आदर वाटत असेच, परंतु त्यांचे शत्रू सुद्धा या चारित्र्याच्या मुद्यावरून त्यांची उघडपणे वाखाणणी करत असत. दिल्लीचा मोगल बादशहा औरंगजेब हा तर शिवाजी महाराजांचा कट्टर शत्रू. पण त्याने सुद्धा शिवाजी महाराजांच्या निधनानंतर शिवाजी महाराजांविषयी अतिशय भावपूर्ण उद्गार काढले होते आणि शिवाजी महाराजांचे चारित्र्य वाखाणण्याजोगे असल्याचे म्हटले होते.

 याच औरंगजेबाची मुले नादान निघाली तेव्हा त्याने आपल्या मुलांना पत्रे लिहून, त्यांनी शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे असा उपदेश त्यांना केला होता. त्यांचे हे चारित्र्य घडण्यामध्ये त्यांच्या आईचा वाटा मोठा होताच, परंतु त्यांचे वडील शहाजीराजे यांचेही मोठे योगदान होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली असली तरी त्या स्वराज्याचे बीज शहाजीराजांच्या मनामध्ये फार पूर्वी रुजलेले होते. आपण एवढे महाप्रतापी आणि शूर असताना आपल्या शौर्याच्या जोरावर आदिलशाही टिकते आणि मोगलांचे वंशज आपल्याच आधाराने राज्य करतात ही खंत त्यांच्या मनाला होती. म्हणून त्यांनी आदिलशहाच्या अधिपत्याखालीच बंगळूरमध्ये राज्य केले असले तरी तिथे त्यांचा सारा जामानिमा राजाप्रमाणे असे आणि त्यांनी आदिलशाहीशी वाटाघाटी करत असताना आपल्याला राजा हा किताब दिला पाहिजे अशी मागणी केलेली होती. म्हणजे सातशे वर्षांच्या अंधःकारामध्ये आशेचा दिवा उजळायचा असेल तर कोणा तरी हिदूने राजा झाले पाहिजे ही विचाराची ठिणगी शहाजीराजांच्या मनात आधी पेटलेली होती. शिवाजी महाराजांचे पुण्यस्मरण तर केलेच पाहिजे, परंतु शहाजीराजांच्या पराक्रमालाही विसरून चालणार नाही.

Leave a Comment