विमानतळावर अधिकार्यांची लोकप्रतिनिधींशी गैरवर्तणूक

नागपूर, २१ फेब्रुवारी – येथील डॉ. बाबाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीआयएसएफचे डेप्युटी कमांडंट प्रणित चंद्रा, सहाय्यक कमांडंट पॉलिअन कॉप व अन्य जवानांनी लोकप्रतिनिधींशी गैरवर्तणूक केली. काँग्रेसचे खासदार दत्ता मेघे यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. राज्यसभा सदस्य खा. विजय दर्डा यांच्या मध्यस्थीमुळे मेघे यांचा अधिक अपमान झाला नाही. मात्र यामुळे सीआयएसएफ जवानांची अरेरावी समोर आली आहे.

२१ फेब्रुवारीपासून सुरू होणार्या  संसदेच्या अधिवेशनासाठी खा. दर्डा यांच्यासह खा. मेघे व खा. विलास मुत्तेमवार रविवारी सायंकाळी इंडिगोच्या विमानाने नवी दिल्लीस रवाना झाले. त्यासाठी दत्ता मेघे हे सर्वात आधी विमानतळावर पोहोचले. त्यांनी बंद गळ्याचा जोधपुरी सूट घातला होता. विमानतळावर येताच सीआयएसएफ जवानांनी सुरक्षा तपासणीसाठी त्यांना कोट काढायला सांगितला. यावर खा. मेघे म्हणाले, तुम्हाला हाताने तपासणी करायची असल्यास हरकत नाही, मात्र कोट काढणे हे अपमानस्पद आहे. आजवर असे कधीच झाले नाही. पण सीआयएसएफचे पॉलिअन कॉप व जवान त्यांच्यावर कोट काढण्यासाठी दबाव आणत होते. त्यानंतर सीआयएसएफचे डेप्युटी कमांडंट प्रणित चंद्रा हे स्वतः तेथे आले.


एव्हाना खा. दर्डा व खा. मुत्तेमवार विमानतळावर पोहोचले. त्यांनी प्रकरण जाणून घेतले. खा. दर्डा यांनी मध्यस्थी करीत मेघे यांना अपमानास्पद वागणूक देऊ नका, अशी विनंती केली. चंद्रा मात्र काही देखील ऐकून घेण्यास तयार नव्हते. त्यांनी कोट काढूनच तपासणी करण्याचा एकच तगादा लावला. या सर्व भानगडीत विमानाला विलंब होत असल्याने खा. दर्डा म्हणाले, मेघे हे येथील ज्येष्ठ लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना अशी वागणूक देऊ नका. तुम्हाला तपासणी करायची असल्यास मी स्वतःचा कोट काढतो. मात्र मेघे यांना हात लावू नका, असे म्हणत खा. दर्डा यांनी स्वतःचा कोट काढलादेखील होता. तरीही चंद्रा ऐकत नव्हते. एकवेळ दिल्लीस जाणे रद्द करीन, मात्र कोट काढणार नाही, अशी भूमिका घेण्याची वेळ तोपर्यंत मेघे यांच्यावर आली होती. अखेरीस खा. दर्डा यांच्या मध्यस्थीने मेघे यांना कोट न काढता विमानात चढता आले. मात्र या दरम्यान सीआयएसएफमुळे त्यांना मोठा मनःस्ताप सोसावा लागला.

Leave a Comment