देशातील सात रेल्वे स्थानकांवर ट्रक ऑन रेल योजना सुरू करण्याची मागणी

नागपूर, २१ फेब्रुवारी – मालवाहतुकीसंदर्भात रेल्वे व त्यानंतर रस्ते अशी वाहतुकीची पुनरावृत्ती टाळून डिझेलची बचत व प्रदूषण रोखण्यासाठी रेल्वेने देशातील सात प्रमुख रेल्वेस्थानकांना हब स्टेशनचा दर्जा द्यावा व त्या ठिकाणाहून ट्रक ऑन रेल ही योजना सुरू करावी, अशी अपेक्षा नागपूर चेंबर ऑफकॉमर्स लि. चे अध्यक्ष जे. पी. शर्मा व सचिव तेजिदरसिग रेणू यांनी व्यक्त केली आहे.


सध्या देशाला ६० टक्के पेट्रोलीयम  पदार्थ आयात करावे लागतात. या योजनेत रेल्वे प्रशासनाने मुंबई, दिल्ली, कांडला, नागपूर, कोलकाता, चेन्नई व बंगलोर या सात स्थानकांना हब स्थानक म्हणून दर्जा द्यावा व त्यानंतर या स्थानकांवरून ट्रक ऑन रेल ही योजना सुरू करावी. यामुळे रेल्वेचे उत्पन्न वाढेल, मालवाहतुक त्वरित होईल, रस्ते वाहतूक कमी होऊन अपघात व प्रदूषण कमी करता येईल, ३५ टक्के डिझेलची बचत होईल. यासाठी रेल्वेला फक्त ट्रक लोडिग वॅगन रॅक तयार करावे लागतील. ५०-५० ट्रक्सचा एक रॅक याप्रमाणे वाहतूक करता येईल. या सातही स्थानकांच्या माध्यमातून दररोज एकूण १५ रॅक सोडता येतील, असे शर्मा यांनी सांगितले. वाढती महागाई लक्षात घेता प्रवासी व मालवाहतूक भाड्यात वाढ करू नये. प्रवाशांची संख्या अधिक असलेल्या मार्गांवर रात्री दोन्ही बाजूंनी दुरांतो गाड्या चालवाव्यात, नागपूर-दिल्ली दुरांतो एक्सप्रेसची घोषणा झाली पण ती गाडी सुरू झाली नाही. ती गाडी त्वरित सुरू करावी. नागपूर-मुंबई व नागपूर-पुणे दुरांतो गाडी दररोज आठवड्यातून तीन दिवस चालवावी. या गाड्यांनी उत्तम सेवा दिल्यास हवाई सेवेतील प्रवासी रेल्वेकडे वळविता येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


सध्या देशात मुंबई-कोलकाता व दिल्ली-चेन्नई या दोन प्रमुख मार्गावर तिहेरी मार्ग  तयार करण्यात येत आहेत. यातील पहिल्या मार्गावर काम सुरू झाले आहे, दुसर्यात मार्गावरील काम त्वरित सुरू करावे. मागील अंदाजपत्रकात वर्ल्ड क्लास स्थानकांच्या यादीत नागपूर स्थानकाचा समावेश करण्यात आला होता. हे काम त्वरित सुरू केल्यास व स्थानक परिसरातील पडीक जागेचा वापर करून त्याठिकाणी स्वस्त दरातील हॉटेल्स व रेस्टॉरेन्ट तयार करण्याचा व त्याच्या देखभालीचा खर्च वसूल करता येईल, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment