काश्मिरबाबतचा चुकीचा प्रचार प्रसारमाध्यमांनी थांबवावा – ब्रि. महाजन

औरंगाबाद, २१ फेब्रुवारी – प्रसारमाध्यमांमधून काश्मीरप्रश्नाला भडक रूप दिले जात असून या विषयाचा बाऊ केला जात आहे. असे प्रकार थांबविले गेले पाहिजेत. घुसखोरांना संपविणे, काश्मिरी जनतेचे मन जिकणे आणि दुष्प्रचार थांबविणे या उपायांनीच काश्मीरची लढाई जिकता येईल, असे प्रतिपादन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले. ‘जागर राष्ट्रीयावाचा’ या अभियानात ‘काश्मीर समस्या आणि उपाय’ या विषयावर ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांत कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर संघाचे शहर संघचालक अनिल भालेराव व प्रांत महाविद्यालयीन प्रमुख रमेश पांडव उपस्थित होते.

ब्रि. हेमंत महाजन पुढे म्हणाले की, दहशतवाद, जम्मू काश्मीरमधील संघर्ष, नक्षलवाद आणि पूर्वांचलातील समस्या हे भारतासमोरील चार मोठे प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांचा परस्पर संबंधही लक्षात घेतला पाहिजे. भारतातील या समस्यांमध्ये सर्वाधिक जीवितहानी नक्षलवादामुळे झाली आहे हे त्यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले. भारताशी रणांगणात युद्ध करून जिकता येत नाही, हे लक्षात आल्यानंतर भारतात छोट्या छोट्या जखमा करून भारताला रक्तबंबाळ करण्याचे धोरण ब्रिदवाक्यासारखे आयएसआय या पाकिस्तानी संघटनेने स्विकारले आहे. भारतभर सध्या सुमारे अडीचशे ते तीनशे वेगवेगळे दहशतवादी गट कार्यरत आहेत. या दहशतवादी कारवायांत रोज सरासरी पाच ते सात भारतीय मरण पावतात.


पाकिस्तानी दहशतवादी सध्या पाकिस्तानातील अंतर्गत संघर्षात व्यस्त असल्याने सध्या भारताकडे त्यांचे लक्ष कमी झालेले आहे, असे सांगून ते म्हणाले की, पुढील वर्षी अफगाणिस्तानातून अमेरिकेने आपले नियंत्रण मागे घेतले तर पाकिस्तानवरचा तालिबानी प्रभाव वाढून भारताला दहशतवादी धोका वाढू शकतो. भारताच्या सर्व शेजारी राष्ट्रात  दहशतवाद वाढत असल्याने भारतीय उपखंड हे धोकादायक झाले आहे. भारताचे पंतप्रधान दहशतवादाचा धोका सर्वात मोठा आहे, असे विधान करतात मात्र हा दहशतवाद रोखण्यासाठी कृती मात्र काहीच करत नाहीत असे ते म्हणाले. काश्मीर प्रश्नाचे विवेचन करताना ते म्हणाले की, ‘ संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये अशांतता आहे, असे नाही तर फक्त काश्मीर खोर्याणतील तीन जिल्ह्यात अशांतता आहे. लडाख आणि जम्मू या भागात काहीच गडबड नाही. काश्मीरमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने फक्त १५ टक्के आणि लोकसंख्येच्या दृष्टीने फक्त वीस टक्के भागात अशांतता आहे. श्रीनगरमध्ये शंभरापेक्षा जास्त संख्येने चौक असतील त्यापैकी फक्त लालचौकात आणि जामा मशिदीजवळ दगडफेक होते. मात्र सर्व काश्मीर जळत असल्याचे चित्र निर्माण केले जाते. हा दुष्प्रचार थांबला पाहिजे.


काश्मिरमधील पन्नास ते साठ टक्के दहशतवादी हे काश्मिरमधील नसून भारताबाहेरून तेथे आणले गेलेले आहेत. पाकिस्तान काश्मिरी दहशतवाद्यांना भरती, प्रशिक्षण, पैसा, समन्वय, हत्यारे या सर्व बाबतीत मदत करते. पाकिस्तानात सध्या ५२ दहशतवादी केंद्रे अस्तित्वात आहेत. ही सर्व प्रशिक्षण केंद्रे पाकव्याप्त काश्मिरमध्ये नागरी वस्त्यांमध्ये असल्याने त्यांच्यावर सहजासहजी हल्ला करता येत नाही असे ते म्हणाले. काश्मिरमधील दहशतवाद्यांची संख्या हळूहळू कमी होत गेली आहे. पाच हजारांवरून आता ही संख्या हजार पाचशेच्या जवळपास आली आहे. त्यामुळे भारतीय सैन्याशी लढण्याची त्याची तयारी नाही. त्यामुळे ते दगडफेक, संप, अफवा असे प्रकार करत आहेत. दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे संपविल्याशिवाय हा दहशतवाद समूळ संपणार नाही असे मत ब्रिगेडियर महाजन यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, घुसखोरांना संपविणे, काश्मिरी जनतेचे मन जिकणे आणि दुष्प्रचार थांबविणे या उपायांनीच काश्मीरची लढाई जिकता येईल. काश्मीरमध्ये केंद्र सरकारने आजवर ९५ हजार कोटी रूपये खर्च केले, मात्र ते काश्मिरी जनतेपर्यंत पोहोचलेच नाहीत. भ्रष्ट राजकारणी आणि प्रशासकांनी ते पैसे गायब केले. काश्मिरमधील राजकारणी आणि प्रशासनातील अधिकारी काश्मिरीच असून काश्मिरच्या वाईट स्थितीला तेच जबाबदार आहेत, असा आरोपही ब्रि. महाजन यांनी केला.

Leave a Comment