वर्धा : पार्थच्या श्युअर स्टार्ट प्रकल्पाचा भर नागरी आरोग्यसेवांवर – डॉ. क्रांती रायमाने

वर्धा, दि. २० फेब्रुवारी राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशनच्या उद्दिष्टांवर आधारित राबविला जाणारा पार्थ या स्वयंसेवक संस्थेचा श्युअर स्टार्ट हा प्रकल्प राष्ट्रीय शहरी आरोग्य  मिशनचे नियोजन कसे असावे हे दाखवणारा ठरणारा आहे असा दावा पार्थच्या महाराष्ट्र प्रमुख आणि माता व बाल आरोग्य विशेषज्ञ डॉ. क्रांती रायमाने यांनी केला आहे.

वर्धा येथील सेवाग्राम मेडिकल कॉलेजमध्ये इंडियन असोसिएशन ऑफ पब्लिक हेल्थ आणि इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन यांची संयुक्त परिषद नुकतीच झाली. त्यावेळी स्टेट हेल्थ सिस्टीम रिसोर्स सेंटरचे कार्यकारी संचालक डॉ. प्रकाश डोके यांच्या उपस्थितीत डॉ. रायमाने यांनी या प्रकल्पाची माहिती दिली.

डॉ. रायमाने म्हणाल्या की, महाराष्ट्रात शहरातील झोपडपट्टीत राहणार्‍या साडेचार कोटी नागरिकांना आरोग्याच्या कोणत्याही सोईसुविधा मिळत नसल्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्या अतिशय गंभीर झाल्या आहेत. झपाट्याने होणार्‍या शहरीकरणामुळे गावातून शहराकडे मोठ्या प्रमाणात लोंढे येत आहेत आणि त्याचा फटका शहरी आरोग्यालाही बसत आहे. त्यामुळे शहरातील झोपडपट्ट्यांमधील आरोग्यसेवांवर आमचा भर राहिला आहे असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, नांदेड, सोलापूर, मुंबई, मालेगाव आणि नवी मुंबईच्या झोपडपट्टी भागात हा प्रकल्प राबवण्यात येत असून उषा या टोपण नावाने झोपडपट्टी सेविका हा प्रकल्प राबवित आहेत. त्यांना चांगला प्रतिसादही मिळत असल्याचा दावा डॉ. रायमाने यांनी केला.

Leave a Comment