महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सहा महिन्यात विधानपरिषदेवर पाठविणार

पुणे दि.२० महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सहा महिन्यात विधापरिषदेवर पाठवण्यासाठी पुण्यातील विधानपरिषद सदस्यही पुढे सरसावले आहेत.त्यातून मुख्यमंत्र्यासाठी त्याग केल्याचे राजकीय श्रेयही मिळेल व उर्वरीत काळासाठी सध्या पृथ्वीराज बाबा यांच्याकडे असलेले राज्यसभेचे सदस्यत्वही मिळेल, असा अंदाज बांधून त्यांच्यासाठी  उल्हास पवार, दीप्ती चौधरी आणि मोहन जोशी या तीन आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. चव्हाण कराड ऐवजी पुण्यातून निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तीन दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून आमदारपदाची निवडणूक लढविण्याचे आदेश मिळाले आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे खासदार आहेत मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर असण्यासाठी त्यांना विधान परिषदेचे सदस्य असणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना आमदारपदाची निवडणूक लढवावी लागणार आहे. याचाच एक अर्थ असाही आहे की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रीपदी सध्या तरी कायम राहणार आहेत.

आमदार उल्हास पवार हे ज्येष्ठ काँग्रेस नेते आहेतच पण ते चव्हाण यांचे निकटवर्तीही मानले जातात. चव्हाण पुण्यातून निवडणूक लढविणार असल्याचे बातमी येताच पवार यांनी ताबडतोब आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली असून त्यांच्यासाठी आपण आनंदाने हा त्याग करू कारण चव्हाण राज्यातील एक चांगले नेते आहेत असेही त्यांनी सांगितले आहे. राजकीय जाणकारांच्या मते उल्हास पवार यांना हा त्याग फायद्याचा ठरण्याची शक्यता असून त्यांना त्याबदल्यात दिल्लीत राज्यसभेत खासदारकी दिली जाण्याची शक्यता आहे.

पुण्याच्या माजी महापौर व आठ महिन्यांपूर्वीच आमदार झालेल्या दीप्ती चौधरी यांनीही मुख्यमंत्र्यांसाठी आपली आमदारकी सोडण्याची तयारी दर्शविली असून सर्वात प्रथम आपणच ही इच्छा प्रदर्शित केली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

खासदार सुरेश कलमाडी यांचे कट्टे विरोधक आमदार मोहन जोशी यांनीही मुख्यमंत्र्यांसाठी आपण सदैव उपलब्ध असून त्यांच्यासाठी आमदारपद सोडण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणूकीसाठी पुण्यातून मोहन जोशी इच्छुक आहेत. आमदारकीच्या बदल्यात पुण्याच्या लोकसभाजागेसाठी तिकीट मिळविण्याचा ते प्रयत्न करत असल्याचे काँग्रेसमधील नेत्यांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून मात्र पृथ्वीराज चव्हाण पुण्यातून निवडणूक लढविणार असल्याबद्दल अद्याप तरी कोणताही संकेत मिळालेला नाही.

Leave a Comment