पर्यावरणाच्या दुष्परिणामावर मार्ग काढण्याचे मुख्य मंत्र्यांचे आवाहन

पुणे  दि.२० पर्यावरण असंतुलनाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी वृक्ष लागवड ह लोक चळवळ बनली पाहीजे.राज्यात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीस शासनामार्फत सहकार्य केले जाईल यासाठी तरुणांनी व संस्थांनी पुढे यावे असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वनश्री पुरस्कार वितरण सोहळ्यात केले.

सामाजिक वनीकरण, ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्यावतीने आयोजित सन २००७ व २००८ या वर्षीच्या महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोजगार हमी योजना मंत्री डॉ. नितीन राऊत हे होते.

राज्य शासनाच्या विविध खात्यांची सांगड घालून रोजगार हमीच्या माध्यमातून राज्यात रोपवाटीका, वनतळी, सार्वजनिक तळी वाढविण्याचा कार्यक्रम राबविण्याचे धोरण ठरविण्यात येईल त्यासाठी केंद्राकडून  रोजगार हमी योजनेसाठी मिळणारा निधी वापरता येईल असे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले,एका बाजुला देशाच्या विकासासाठी पुढील काही वर्षात वीजेची निर्मिती चौपट पटीने वाढविणे आवश्यक आहे. तर कोळसा व इतर माध्यमातून वीज निर्मिती मुळे होणारे हवामानातील दुष्परीणामाचे संकट आहे.हवेतील कार्बड डाय ऑक्साईडचे वाढते प्रमाणही चिताजनक आहे. या बाबीवर मात करण्यासाठी संधोशन चालू आहे. तथापि वृक्ष लागवड व संवर्धन हा आपल्या हातातील उपाय आपण अमलात आणणे गरजेचे आहे. असे सांगून  पुरस्कार प्राप्त संस्था व व्यक्तींच्या कार्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी कौतुक केले.   

सामाजिक वनीकरण, जलसंधारण व रोजगार हमी याजनेद्वारे हरित ग्रामपंचयात, हरित जिल्हा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमातून लागवड केलेल्या वृक्षाद्वारे मिळणा-या उत्पन्नावर ग्रामपंचायतीचा अधिकार राहील. याच प्रेरणेतून हरित महाराष्ट्र या चळवळीला गती देता येईल. कार्बन क्रेडीट वाढविण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येतील असे रोजगार हमी योजनामंत्री  डॉ. नितीन राउत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.

जलसंधारण व रोजगार हमी योजना विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी  सर्वांचे स्वागत केले. सामाजिक वनीकरण विभागाचे संचालक सै. वा. हू. नकवी यांनी प्रास्ताविकमध्ये  सन २००७ व २००८ मध्ये राज्यात वनीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या राज्यस्तरावरील एकूण २८, महसूल विभाग स्तरावरील एकूण ४१ विजेत्यांचा तर सहा वृक्षमित्र प्रतिक संस्थाना वनश्री पुरस्काराने गौरविण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी आमदार विनायकराव निम्हण, प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांची समयोचित भाषणे झाली.

कार्यक्रमास विभागीय आयुक्त दिलीप बंड, सामाजिक वनिकरण, जलसंधारण, ग्रामविकास विभागाचे अधिकारी व पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.