इंद्राय स्वाहा

महाभारतामध्ये तक्षक सर्पाची गोष्ट आहे. एका सर्पयज्ञामध्ये जगातले सगळे सर्प येऊन पडत होते. परंतु ज्या तक्षकाची अपेक्षा होती तो तक्षक काही यज्ञात येऊन पडत नव्हता. त्यामुळे तक्षकाय स्वाहा हा मंत्र म्हणण्यात आला. मात्र तक्षकाला इंद्राचे संरक्षण होते. त्यामुळे यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांनी तक्षक येत नसेल तर इंद्राला सुद्धा यावे लागेल असे म्हणून तक्षकाय स्वाहा बरोबरच इंद्राय स्वाहा असेही म्हणायला सुरुवात केली. २ जी स्पेक्ट्रमच्या प्रकरणात आता असेच व्हायला लागले आहे. ए. राजा यांना आजवर करुणानिधी यांचे संरक्षण होते आणि करुणानिधींच्या मुठीमध्ये मनमोहनसिग सरकारच्या स्थैर्याचे आणि अस्तित्वाचे रहस्य दडलेले होते. त्यामुळेच आपले सरकार टिकवण्याच्या हतबलतेमुळे मनमोहनसिग ए. राजा यांना आणि करुणानिधी यांना सुद्धा वाचवण्याची धडपड करत होते. आजपर्यंत असे आरोप होत होते. पण आता पंतप्रधानांनी ते कबुलच केले आहे. आता ए. राजा १४ दिवसांसाठी जगप्रसिद्ध तिहार कारागृहात जाऊन बसले आहेत. त्यांच्या अटकेतून इतक्या नव्या प्रकरणांची साखळी दिसायला लागली आहे की, ती जसजशी वाढत जाईल तसतसे नवे नवे लोक चौकशीच्या कक्षेत यायला लागतील आणि ए. राजा यांचा तिहार कारागृहातला मुक्काम बराच काळ राहील असे वाटत आहे. कारण राजा यांच्या चौकशीतून ज्यांची नावे निष्पन्न होतील त्यांच्या आर्थिक स्थितीचा, प्रतिष्ठेचा कसलाही विचार न करता त्यांची चौकशी करा आणि गरज पडल्यास त्यांना अटक करा, असा आदेशच सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिला आहे. त्यामुळे राजा यांच्या पाठोपाठ जगातल्या फोर्ब्सच्या यादीमध्ये अतिश्रीमंत म्हणून नोंद झालेला शहीद बलवा सीबीआयच्या अटकेत पडला आहे. या दोघांच्या चौकशीतून नवनव्या भानगडी समोर येत आहेत आणि त्यात आता अनिल अंबानींची चौकशी सुरू झाली आहे. अनिल अंबानी यांच्या जनसंफ यंत्रणेने या चौकशीचा इन्कार केला आहे.

कारण अशा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात रियालन्स कंपनीच्या मालकाला अटक झाली तर कंपनीची इज्जत जाईल, अशी भीती त्यांना वाटते. म्हणून सीबीआयने चौकशीला बोलावले असताना सुद्धा कंपनीचे जनसंफ अधिकारी त्याचा इन्कार करून, अंबानी यांना सीबीआयने बोलवले नव्हते तर ते स्वतःच सहज फिरत फिरत तिकडे गेले होते असा विनोदी खुलासा करत आहेत. मागे अनिल अंबानी यांच्या कंपनीवर सेबीने बरेच निर्बंध लादले होते आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली होती. त्यावेळी सुद्धा कंपनीने असेच हास्यास्पद खुलासे केले होते. अनिल अंबानी यांच्या कंपनीचे अनेक व्यवहार बेकायदा असतात अशी त्यांची ख्याती आहे. परंतु ही चर्चा आजवर केवळ कुजबुजीच्या स्वरुपात होत होती. तिला आता कायद्याचा आधार सापडायला लागला आहे. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत अंबानी यांच्या अटकेचे वृत्त आले तर कोणालाही धक्का बसणार नाही इतके त्यांचे लागेबांधे या भ्रष्टाचारात गुंतलेले दिसत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात चौघे अटकेत पडलेलेच आहेत. अनिल अंबानी चौकशीच्या कक्षेत आले आहेत. आता तमिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांची कन्या कनिमोझी ही सीबीआयच्या चौकशीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण ए. राजा, शहीद बलवा या दोघांच्या अटकेतून आणि चौकशीतून २१७ कोटी रुपयांच्या कर्जाचे प्रकरण संशयास्पद बनले आहे. ज्या काळामध्ये २ जी स्पेक्ट्रमच्या  भानगडी होत होत्या त्याच काळामध्ये बलवा यांच्या सिनेयुगकडून करुणानिधी यांच्या कलैग्नार या वृत्तवाहिनीला २१७ कोटी रुपये दिले गेले आहेत. ते का दिले गेले हा चौकशीचा मुद्दा झाला आहे. कारण हे कर्ज देणे आणि बलवा याच्या स्वान टेलिकॉम या अपात्र कंपनीला २ जी स्पेक्ट्रमचे परवाने देणे आणि तेही बेकायदारित्या या गोष्टी एकत्र घडत होत्या. तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यातल्या काही नेत्यांच्या मुलांनी दूरचित्रवाणी वाहिनी सुरू करणे हा एक नवा सोपा उद्योग हाती घेतला आहे. तो हाती घेतला की, वडिलांच्या पदाचा वापर करून त्या वाहिनीमध्ये काही उद्योगपतींना भराभर पैसे गुंतविण्यसाठी भाग पाडता येते. एच.डी. देवेगौडा यांच्या सुनेने, राजशेखर रेड्डी यांचे चिरंजीव जगनमोहन यांनी आणि करुणानिधींची कन्या कनिमोझी या तिघांनीही ही युक्ती चांगली वापरलेली आहे. जगनमोहन रेड्डी याच्या वाहिनीमध्ये तर आंध्रातल्या अनेक उद्योगपतींनी एका रात्रीतून करोडो रुपये गुंतवले आहेत आणि आज तो वडिलांच्या पदाचा असा वापर करून अब्जाधीश होऊन बसला आहे. करुणानिधी यांची कन्या कनिमोझी हिने सुद्धा याच मार्गाने शहीद बलवा करून २१७ कोटी रुपये मिळवले आहेत. कनिमोझी हिची दूरचित्रवाणी वाहिनी २१७ कोटी रुपये एकदम गुंतवावेत एवढ्या लायकीची होती का? याचा शोध घेतला तर २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचे लोण कनिमोझी हिच्यापर्यंत आणि पर्यायाने तिचे वडील मुख्यमंत्री करुणानिधी यांच्यापर्यंत पोचायला काहीही वेळ लागणार नाही. सीबीआयचा तपास योग्य त्या दिशेने चाललेला आहे.

Leave a Comment