मुंबई : सूर्यनमस्कार कार्यक्रम अधिक संख्येने होणे गरजेचे – मोकाशी

मुंबई, १३ फेब्रुवारी – सूर्यनमस्कार हा शरिराला वरदान ठरणारा व्यायामप्रकार आहे. याचा समाजात अधिकाधिक प्रसार होण्यासाठी सामुहिक सूर्यनमस्कार कार्यक्रम अधिक संख्येने होणे गरजेचे असल्याचे मत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद मोकाशी यांनी व्यक्त केले. अंकुर प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेतर्फे आयोजित सामुहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमात ते बोलत होते. माटुंगा येथील श्रध्दानंतर महिलाश्रम, दादर येथील फेमेली होम आणि काळाचौकी येथील माझे माहेर या संस्थांतील सुमारे १०० विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाली होते.

रविवारी दादर येथील नायगाव पोलिस संचलन मैदानात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंचावर आंतरराष्ट्रीय ख्यातील मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रसाद परुळेकर हे उपस्थित होते. क्रीडाप्रकार आणि व्यायामप्रकारात महिलांचे वाढणारे प्रमाणम स्वागतार्ह असल्याचे मोकाशी यांनी आपल्या भाषणात सांगितले. मुलगी शिकली की तिचे कुटूंब साक्षर होण्यास मदत होते, त्याचप्रमाणे घरातील महिला शारिरीक तंदुरुस्तीबद्दल जागरुक असेल तर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, असेही ते म्हणाले.

उदय देशपांडे यांनी यावेळी बोलताना सूर्यनमस्कार या व्यायामप्रकाराचे शास्त्रीय महत्व सांगितले. आपले शरीर सुदृढ ठेवण्यासाठी हजारो रुपये भरुन व्यायाम उपकरणे वापरणाऱ्या मंडळींची संख्या आज कमी नाही. पण सूर्य नमस्कारासारखा सर्वांगीण आणि संपूर्ण शरिराला लाभदायक असणारा व्यायामप्रकार आजही दुर्लक्षित असल्याबद्दल देशपांडे यांनी खंत व्यक्त केली. सूर्यनमस्काराचा प्रचार होण्यासाठी अशा प्रकारचे सामुहिक कार्यक्रम मोठी भूमिका बजावित असून सर्व शाळांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आवर्जुन घेतले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. अनाथ बालकांचा सर्वांगिण विकास साधून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी अंकुर प्रतिष्ठान कार्यरत असल्याचे अध्यक्ष प्रा. परुळेकर यांनी सांगितले. बालकातील सुप्त गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांचे व्यक्तिमत्व फुलविणारे विविध उपक्रम अंकुर प्रतिष्ठानतर्फे राबविले जात आहे. जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून प्रतिष्ठानने सामुहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Comment