पुणे : पुणे महापालिका आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप

पुणे, १३ फेब्रुवारी – गेले तीन तीन दिवस भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलादालनाचे उद्घाटन, शास्त्रीय संगीत, सरोदवादन, भावगीते, भजन यांच्या मैफली, भारतरत्न लता मंगेशकर यांना स्वरभास्कर पुरस्काराने गौरविणे आदी कार्यक्रमांनी रंगलेल्या पुणे महापालिका आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. सहकारनगर भागातील बागूल उद्यानात हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, उपेंद्र भट यांची संतवाणी, करुणा पाटील व सहकाऱ्यांनी सादर केलेला मिले सूर मेरा तुम्हारा या कार्यक्रमांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. पुणे मनपा विरोधी पक्षनेते व स्थानिक नगरसेवक आबा बागूल यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केले. घनश्याम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. भारतरत्न लता मंगेशकर यांना स्वरभास्कर पुरस्कार प्रदान झाल्यानंतर हे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. प्रारंभी आरती अंकलीकर-टिकेकर यांनी मारु बिहान बंदीश सादर केली. मध्य लय रुपक, कल नाही आये साँवरे, जागू मे सारी रैना आदी सादर करुन बोलावा विठ्ठल या भजनाने कार्यक्रमाची समाप्ती झाली. साथसंगत प्रियल साठे (तानपुरा), अल्पिता गावकर (तानपुरा), मिलिद कुलकर्णी (हार्मोनियम) व निलेश रणदिवे (तबला) यांनी दिली.

पंडित भीमसेन यांचे शिष्य उपेंद्र भट यांनी सादर केलेल्या संतवाणीमध्ये इंद्रायणी काटी, याजसाठी केला होता हट्ट हास, माझे माहेर, तीर्थ विठ्ठल, कृष्ण कृष्ण कही हो, यांचा समावेश होता. त्यांना राजेंद्र हसबनीस यांनी तबल्यावर, नंदू भांडवलकर यांनी पखवाजवर, उमेश पुरोहित यांनी हार्मोनियमवर साथ दिली. सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप ऋतूरंग कल्चरल ग्रुपतर्फे करुणा पाटील यांनी सादर केलेल्या मिले सूर मेरा तुम्हारा या बहारदार कार्यक्रमाने करण्यात आला. यात प्रसिध्द नृत्य कलाकार शर्वरी जमेनीस, परिमल फडके व केतकी काळे यांच्याबरोबर पुण्यातील उगवत्या कलाकारांनी सहभाग घेतला.

Leave a Comment