जीर्ण नोटांमुळे त्रस्त नागरिक

पुणे दि. १४ – जीर्ण नोटांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना रिझर्व्ह बँकेने घोषित केलेल्या नव्या योजनेमुळे बराचसा दिलासा मिळाला आहे. रिझर्व्ह बँकेने क्लीन नोट पॉलिसी योजना जाहीर केली असून त्यात नागरिकांना त्यांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात त्या किमतीची नाणी अथवा कोर्या  नोटा मिळणार आहेत. पुण्यात या योजनेसाठी स्टेट बँकेने पुढकार घेतला असून मार्चपासूनच ही योजना स्टेट बँकेच्या काही शाखांमध्ये कार्यान्वित करण्यात येत आहे.

या विषयी अधिक माहिती देताना पुणे विभागीय व्यवस्थापक उत्तरा दासगुप्ता यांनी सांगितले की या योजनेअंतर्गत आमच्या काही शाखात सुट्या नाण्यांची यंत्रे बसविण्यात येत आहेत. या मशीनमध्ये १ रूपयापासून ५०० रुपयांपर्यंतच्या जुन्या नोटांच्या बदल्यात १ ते ५ रूपयांची नाणी मिळू शकतील. सध्या ही योजना प्रायोगिक तत्वावर आहे. काही  शाखांत जीर्ण नोटांच्या बदल्यात नव्या नोटा देणारी मशीन्सही बसविण्याचा बँकेचे प्रयत्न आहेत.तसचे स्टेट बँकेच्या सर्व एटीएम मशीनमधूनही नव्या कोर्याह नोटाच ग्राहकांना दिल्या जाणार आहेत. सध्या बँकांच्या शाखात जुन्या नोटा बदलून दिल्या जातात पण हे काम माणसांनाच करावे लागते.

स्टेट बँकेपाठोपाठ बँक ऑफ इंडिया आणि सिंडीकेट बँकही या योजनेत सामील होत आहेत. या मशीनमध्यें गोळा झालेल्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात यायच्या असून त्या तेथे नष्ट केल्या जातील. अर्थात ही मशीन्स कोणत्याही प्रकारची जीर्ण नोट स्विकारणार असली तरी फाटक्या अथवा सेलोटेपने चिकटविलेल्या तसेच बनावट नोटा मात्र स्विकारणार नाहीत असे समजते.

Leave a Comment