जर्मन बेकरीतील बळींना श्रद्धांजली

पुणे १३ फेब्रुवारी – एक वर्षापूर्वी येथील जर्मन बेकरीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील बळी पडलेल्यांना आज दिवसभरात एक लाखाहून अधिक लोकांनी श्रद्धांजली अर्पण केली. पुण्याच्या पूवीं भागात कोरेगावपार्कभागात असलेल्या या छोट्याशा दुकानाच्या बेकरी व रेस्टॉरंटच्या जागेत गेल्या वर्षी दि. १३ तारखेला हा अपघात झाला. एक वर्ष झाले तरी अजून मृतांच्या नातेवाइकांच्या आणि जखमीच्या जखमावर खपली धरलेली नाही. आज त्या ठिकाणी पहाटेपासून बंदोबस्त होता आणि पहाटेपासूनच लोकांची रीघ लागली होती. शहरातील आमदारांनी आणि नगरसेवकांनी आपली हजेरी लावली आणि शंभरपेक्षा अधिक शाळांतील मुलांनीही हजेरी लावली.

या घटनेतील संशयीत आरोपी रिझवान डावरे आणि सोएल शेख अजून सापडलेले नाहीत,ज्यांना अटक केली आहे त्यांच्यावर अजून आरोपपत्र ठेवता आलेले नाही. आणि मुख्य आरोपीही अजून सापडलेले नाहीत.

गेले वर्षभर शहरात सर्वत्र बंदोबस्त असून लष्करी जवान, पोलीस दल, निमलष्करी दल आणि खाजगी सुरक्षा मंडळे यांचे मिळून पंधरा हजारापेक्षा अधिक लोक सुरक्षेवर लावलेले आहेत. आज रविवार असल्याने शहरभर अनेक ठिकाणी जर्मन बेकरीतील बळींना श्रद्धांजली अर्पण करण्याचे कार्यक्रम झाले.

Leave a Comment