महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा मिळून आठवले गटाशी युती करणार अशी चर्चा सुरू आहे. आता आघाड्यांचे युग आहे. तेव्हा विचारसरणीची फार चर्चा न करता आता अनेक पक्षांच्या एरवी तत्त्वहीन वाटणार्या आघाड्या होऊ शकतात. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मागे अनेकदा केले आहे. आपल्या म्हणण्याच्या त्यांनी परदेशांतली उदाहरणे दिली. जर्मनी, फ्रान्स आणि आता ब्रिटनमध्येही आघाडीची सरकारे आहेत आणि ती यथास्थित चालली आहेत. भारतात मध्यंतरीचा काही काळ सोडला तर वाजपेयी यांचे आणि मनमोहन सिंग यांचे सरकार स्थिर राहिलेले आहे. या सार्या सरकारांत १८ ते २० पक्ष होते. त्यातल्या सार्याच पक्षांच्या कुंडल्या जमत होत्या असे काही नाही. तेव्हा महाराष्ट्रात आठवले गट आणि भाजपा-सेना युती यांची आघाडी तयार झाली तर ते अशक्यही नाही आणि तशी ती झाली तर कोणाला काही वाईट वाटण्याचे कारण नाही.
आबांची भविष्यवाणी
असे असले तरी महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या युतीला जनता थारा देणार नाही असे भाकित वर्तवले आहे. आठवले हे धर्मनिरपेक्ष आहेत आणि त्यांनी आजवर कधी जातीयवाद्यांना जवळ केलेले नाही. तेव्हा अजूनही ते विचार करतील असे आबांनी म्हटले आहे. आबांनी मध्यंतरी विधाने करणे बंद कले होते. पण आता पुन्हा त्यांनी बोलायला सुरूवात केली आहे. ते फार डायलॉगबाजी करतात आणि ते डायलॉग वाया गेले की, अशा डायलॉगचा अर्थ शब्दशः घ्यायचा नसतो असे म्हणून मोकळे होतात. आताही त्यांनी सरळ सरळ या युतीची शक्यताही फेटाळली आहे आणि ती झालीच तर जनता तिला थारा देणार नाही असे भविष्य वर्तवले आहे. या दोन्ही विधानांचा परामर्श घेतला पाहिजे. या आघाडीला जनता थारा देईल की नाही याची भविष्यवाणी कोणीच करू शकत नाही पण आता सत्तेवर आलेली आघाडी आपल्या कारभारात इतकी अपयशी ठरली आहे की जनता तिला फेकून द्यायला फार उत्सुक आहे. तेलात भेसळ करणारा एक भडभुंजा गुंड अतिरिक्त जिल्हाधिकार्याची हत्या करतो असे सरकार जनतेला नको आहे. त्याच्या ऐवजी कोणतीही आघाडी निवडायला ही जनता उत्सुक आहे कारण आहे त्या आघाडीने त्यांचा रोजचा घास महाग केला आहे आणि क्षणा क्षणाचे जगणे असुरक्षित करून टाकले आहे.
आता आबांनी उपस्थित केलेल्या जातीयवादी पक्षांशी युती करण्याच्या मुद्याचा विचार करू. आज या देशात आबांच्या पक्षांसह सारेच पक्ष जातीयवादी झाले आहेत. सर्व पक्ष जातींचेच राजकारण करायला लागले आहेत. कोणी कोणाला जातीयवादी म्हणून हिणवण्याची सोय राहिलेली नाही. तेव्हा आपल्याला कोणाशी युती करायची असली की तो पक्ष सेक्युलर वाटायला लागतो आणि त्याच्याशी युती नको असली की तो जातीयवादी असल्याचा साक्षात्कार होत असतो. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे पक्ष जातीयवादी आहेत म्हणून त्यांच्याशी युती करण्याचे कोणीच टाळू शकत नाही. आबांना पुणे पॅटर्न माहीत नाही असे कसे म्हणता येईल. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि राष्ट*वादी यांनी काही वर्षे हातात हात घालून महानगरपालिकेत काम केले आहे.तेव्हा गरज पडेल तशी धर्म निरपेक्षतेची टोपी फिरवून जातीयवादी पक्षांशी युती केली जात असत. असे स्वार्थासाठी म्हणजेच खुर्चीसाठी करणारांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे एवढेच नाही तर आघाडीवर आहे. आबांनी उगाच धर्म निरपेक्षतेची ग्वाही देऊन भीम शक्ती आणि शिवशक्तीच्या एकत्रिकरणाला शाप देऊ नये. ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षात तरी असली प्रवचने शोभत नाहीत.
थोडे इतिहासात डोकावून पाहिल्यास या बाबतच्या ढोंग धत्तुर्याची अनेक उदाहरणे सापडतात. महाराष्ट्रात आबांचे दैवत शरदराव पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर वगैरे खुपसून पुलोद आघाडी तयार केली तेव्हा त्यासाठी ज्यांच्याशी हातमिळवणी केली होती त्यात जातीयवादी नव्हते का ? पवारांच्या त्या मंत्रिमंडळात उत्तमराव पाटील, हशु अडवाणी आणि प्रमिला टोपले हे तीन माजी जनसंघाचे नेते होते. त्यातले दोघे तर जनता पार्टीत असूनही रोज संघाच्या शाखेवर जाणारे होते. त्यावेळी पवारांना त्यांचा जातीयवाद आडवा आला नाही. आता आबांना ही युती बोचत आहे. एवढे कशाला पवारांना कोणताही पक्ष चालतो. त्यांनी उद्या त्यांनी भाजपाशी युती केली तर आबा काय करणार आहेत ? ते काय पवारांनी जातीयवाद्यांशी युती केली म्हणून राष्ट्रवादीच्या बाहेर पडणार आहेत का ? त्यावेळी भाजपा आणि शिवसेनेचे गुणगाण करण्यात आबा आघाडीवर असतील. आबा दादांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये काम करीत होते त्या काळापासून काँग्रेसने केरळात मुस्लिम लीगशी युती केलेली आहे. आबांनी त्या काळात कधी धर्मनिरपेक्षतेचे दळण दळल्याचे ऐकण्यात आले नाही. आताच त्यांना आठवले आपल्या कचाट्यातून सुटून भाजपा- सेनेच्या कळपात चालले म्हणून धर्मनिरपेक्षतेच आठवण झाली आहे का ?
आठवले धर्मनिरपेक्षता आणि राज्याच्या राजकारणात जातीयवाद्यांना एकाकी पाडण्याच्या कल्पनांच्या आहारी जाऊन राष्ट्रवादी काँग्रसच्या आहारी गेले परंतु आता त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यातल्या त्यात खैरलांजी प्रकरणात दलित जनतेचा राग आबांवरच जास्त होता कारण त्यांच्या पोलीस खात्याने हे प्रकरण पूर्णपणे दाबून टाकले होते. त्याची चौकशी सीबीआय कडून झाली म्हणून या प्रकरणात भोतमांगे कुटबाला न्याय तरी मिळाला पण तिथे आबांचा जात निरपेक्ष पक्ष उघडा पडला होता. या दलित तरुणांना आता भाजपा आणि शिवसेनेशी युती करावी वाटत असेल तर त्यात काय चूक आहे. जनतेला ही युती मान्य होणार की नाही ते जनतेला ठरवू द्या.