मध्यप्रदेश : पंथ आणि मतभेद विसरून उपेक्षितांना धर्माच्या मूळ प्रवाहात सामील करणे अत्यावश्यक- शंकाराचार्य श्रीवासुदेवानंद

मंडला, दि. १२ फेब्रुवारी भारतीयांचा हिदू धर्म सर्वश्रेष्ठ आहे यात शंकाच नाही. परंतू धर्माच्या मूळ तत्वांचाच आम्हाला विसर पडला असून व्यावहारिक धर्मालाच जीवनात प्रमुख स्थान मिळाले आहे. भारतात वर्णाश्रम धर्मव्यवस्था होती. मात्र त्यातील एका आश्रमधर्माला ‘दलित’ असे परकीय आक्रमकांनी संबोधले आणि कालांतराने तेच रूढ झाले. आज या दलितांना हिदू धर्माच्या मूळ प्रवाहात सामील करून घेणे अत्यावश्यक आहे असे आवाहन जगत्गुरू शंकराचार्य स्वामी श्रीवासुदेवानंद यांनी येथे केले. गेले तीन दिवस येथे सुरू असलेल्या नर्मदा सामाजिक कुंभमेळ्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

धर्म, समाज आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीने आयोजिलेला हा सामाजिक कुंभमेळा अत्यंत यशस्वी झाल्याचे सांगत, पुढील कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी कुंभदंड छत्तीसगढचे मुख्यमंत्री डॉ.रमणसिह यांच्याकडे स्वामी वासुदेवानंद यांनी सुपूर्द केला. पुढील कुंभसुद्धा अशाचप्रकारे यशस्वी होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मंडला येथे झालेल्या या कुंभमेळ्याचे श्रेय त्यांनी सामान्य भारतीयंाना दिले. गेले तीन दिवस चाललेल्या या मेळ्याला लाखो हिदू आले होते. त्यासाठी देशभरातून गोरगरीब जनतेनेसुद्धा मुठमुठभर धान्य दान केले होते. यातूनच हा मेळा यशस्वी झाला असे उद्गार शंकराचार्यांनी काढले.  धर्मसभेला संबोधित करताना  हिदुधर्माची दहशतवादाशी सांगड घालणार्यांंवर शंकराचार्यांनी कडक शब्दात टीकादेखील केली.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी तसेच संत आसाराम बापू, जबलपूरचे स्वामी अखिलेश्वरानंद महाराज आणि कुंभमेळ्याचे सचिव राजेंद्रजी यांचेही यावेळी भाषण झाले. हे सामाजिक कुंभमेळे देशाला आणि समाजाला प्रगतीपथावर वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात असे उद्गार भैय्याजी जोशी यांनी काढले. गुजरातमधील डांगनंतर मंडला येथे झालेला हा कुंभमेळा अतिशय चांगल्याप्रकारे यशस्वी झाल्याचे प्रशस्तीपत्रकही त्यांनी दिले. समाजाच्या धार्मिक एकजिनसीपणावर भर देत भैय्याजी जोशी यांनी आजचा हिंदू समाज विविध गटातटात आणि पंथात विभागला गेला असल्याकडे लक्ष वेधले. आज आम्ही आपल्याच लोकांचा स्वीकार करण्यात कचरतो हेही त्यांनी उपस्थितांच्या नजरेस आणले. एकाच प्रकारच्या जीवनशैलीचा अंगीकार करणारे विविध मानवसमूह वस्तुतः एकाच समाजाचे अंग आहेत. त्यामुळेच आपसातील भेदभाव दूर करून सार्वत्रिक समरसता आणण्यासाठी आम्ही सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. मानवता हा धर्माचा आत्मा आहे. मात्र त्यासाठी सर्वांगाने प्रयत्न केले पाहिजेत. असे झाल्यास एकजिनसी समाजाची निर्मिती दूर नाही असे ते म्हणाले. यावेळी माजी सरसंघचालक के.सी. सुदर्शन यांनी ‘नमामि देवी नर्मदे’या पुस्तकाचे प्रकाशन केले. या धर्मसभेत विदर्भाचे जितेंद्रनाथजी महाराज, अवधेशकुमार, अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष जगदेवराम उराव, साध्वी प्रतिभादेवी तसेच बालकदासजी महाराज यांचीही भाषणे झाले.

Leave a Comment