पुण्यात दोन गटांमधील वादविवादात एकाचा खून

पुणे: नातेवाईकातील व्यवसायाच्या वादातून दोन गटात झालेल्या मारामारीत एका युवकाचा धारदार शस्त्रे आणि दगडांनी मारून खून करण्यात आला. हा प्रकार चाकणजवळ म्हाळुंगे इंगळे या गावात काल (शुक्रवार) रात्री घडला.
     काल रात्री ८ वाजता दोन गटात झालेल्या मारामारीत संतोष जनार्दन वाळके याला त्याच्या रहात्या घराजवळ जमावाने तलवार, काठ्यानी घाव घालून आणि दगडाने ठेचून गंभीर जखमी केले. त्याला पुणे येथील निरामय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याच्या रात्री उशीरा मृत्यू झाला. आणखी ८ जण जखमी असून त्यापैकी एक अत्यवस्थ आहे. या प्रकरणी गणेश अशोक शिवले(२२, रा.म्हाळुंगे इंगळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजेंद्र आनंदराव भोसले याच्यासह एकूण १४९ जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     या दोन्ही गटातील युवक एकमेकांचे नातेवाईक असून वाळके आणि भोसले यांच्या पत्नी एकमेकींच्या सख्ख्या बहिणी आहेत. या दोन्ही गटातील युवक चाकण परिसरातील विविध कंपन्यांमध्ये मजूर पुरविण्याचे कंत्राट घेतात. या कंत्राटातील व्यवहार आणि कौटुंबिक मालमत्तेसह अन्य कारणांवरून त्यांच्यात दीर्घ कालापासून वैमनस्य आहे. मागील वर्षी दि. ६ फेब्रुवारी रोजी या दोन्ही गटात अशाच प्रकारे मारामारी झाली होती. यावेळी मात्र या भांडणाचे पर्यावसान खुनात झाले.
      चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment