जर्मन बेकारी बॉम्बस्फोटला एक वर्ष पूर्ण

पुणे: दिनांक १३ फेब्रुवारी! याच दिवशी सन २११० मधे  शांत आणि सुरक्षित समजल्या जाणार्या पुणे शहरात देशविघातक शक्तींनी घडवून आणलेल्या बॉम्ब स्फोटाने शहरात खळबळ उडवून दिली. या घटनेला रविवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात दक्षतेचा इशारा दिला असून सुरक्षेचे कडक उपाय योजण्यात आले आहेत.
     एक वर्षापूर्वी कोरेगाव पार्क या शहरातील उच्चभ्रू परिसरातील विदेशी नागरिकांची वर्दळ असलेल्या जर्मन बेकरीच्या बाहेर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात नऊ जण जागीच ठार झाले तर ६० जण जखमी झाले. पुण्याचे वातावरण ढवळून काढणार्या या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना शहरात करण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजनांबाबत शहराचे सह पोलीसआयुक्त अशोक धिवरे, अतिरिक्त पोलीसआयुक्त अनंत शिंदे आणि पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांनी माहिती दिली.
     शहरात दि.१२,१३ आणि १४ हे तीन दिवस दक्षतेचा इशारा देण्यात आला असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी शहर पोलीस दलासह राज्य राखीव पोलीस दल आणि मुंबईतील ‘फोर्स वन’ च्या धर्तीवर शहर पोलीस दलात स्थापन करण्यात आलेल्या अतिशीघ्र कृतीदलाचे सहकार्य घेण्यात आले आहे. विशेषत: आपत्कालीन परिस्थितीत लढण्याबरोबरंच गुप्त वार्ता संकलनाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आलेल्या अतिशीघ्र कृतीदलाला पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले आहे. विशेषत: बंदी घालण्यात आलेल्या संघटनांचे संशयित सदस्य आणि त्यांच्या हालचाली आणि जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी ज्यांची आजपर्यंत चौकशी करण्यात आली आहे असे संशयित यांच्या हालचालींवरही डोळ्यात तेल घालून नजर ठेवण्यात येत आहे.
     शहरातील संवेदनशील ठिकाणी; विशेषत: रजनीश आश्रम, छबाड हाउस, लाल देऊळ, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर, या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात प्रवेश करण्याच्या मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली असून शहरात येणार्या वाहनांची आणि व्यक्तींची कसून तपासणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शहरातील लोजेस, हॉटेल्स अशा ठिकाणी येणार्या अभ्यागतांचीही चौकशी करण्यात येत आहे.
     या पार्श्वभूमीवर शहरात कोणतीही अनुचित घटना घडू दिली जाणार नाही. मात्र नागरिकांनीही सजग राहून पोलिसांना सहकार्य करावे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत किंवा अफवांना बळी पडू नये; असे आवाहन शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले.

Leave a Comment