मध्ययुगीन मनस्थिती

आपला देश  एकविसाव्या शतकात आला आहे असे आपण मानतो. पण, खरेत तसे घडले आहे का ? काही लोक आधुनिक जीवन जगायला लागले म्हणजे  एकविसाव्या शतकात आले असे म्हणता येत नाही. कारण देश एकविसाव्या शतकात गेला तरीही काही लोक मनाने आणि विचाराने चार दोन शतके मागेच असतात.आपल्या देशातली जनता खरेच कितव्या शतकात जगते आहे याचा हिशेबच करायचा झाला आणि निरनिराळे समाज घटकांचे याबाबत निरीक्षण करून सरासरी काढली तर आपण अजूनही सोळाव्या किवा सतराव्या शतकात जगत आहेत अस आढळेल. सामान्य माणसे अशा मध्ययुगीन कल्पना मनाशी बाळगून जगतात हे साहजिक आहे कारण त्यांना पुढे आणण्याचा कोणी प्रयत्नच केलेला नाही पण आपले नेतेही याच मनस्थितीत जगत असतील तर मात्र या देशाचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाल्या शिवाय राहात नाही.

कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे त्यातलेच एक. त्यांच्या मुख्यमंत्रिपदात इतके अडथळे येत आहेत. नेत्यांच्या मार्गात अडथळे की ते त्यांच्यामागची राजकीय कारणे शोधतात, कोणी तरी कायद्यातली कारणे शोधतात पण येडीयुरप्पा यांनी एक वेगळेच कारण शोधले आहे. ते म्हणजे भानामती. आपल्यावर कोणीतरी भानामती केली आहे. त्यामुळे आपण विधानसभेत जाताना जातो खरे पण घरी सुखरूपपणे परतू  की नाही याबाबत शंका वाटते, इतका त्यांनी आपल्यावरच्या या करणीचा धसका घेतला आहे. त्यांनी प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या काँग्रेस आणि जनता दलाच्या नेत्यांपेक्षा या अस्तित्वात नसलेल्या भानामतीचीच धास्ती घेतली आहे. येडीयुरप्पा यांनी आपण किती मध्ययुगीन मनस्थितीत वावरत आहोत हेच दाखवून दिले आहे. लोक चंदा्रावर गेले पण आपण अजून मनाने मंत्र तंत्र आणि जादूटोण्याच्याच युगात वावरत आहोत.  आपल्या देशातले अनेकच काय पण बहुतेक नेते अंधःश्रद्ध असतात. पण त्यांच्यातली ही अंधःश्रद्धा ज्योतिष्यशास्त्रा पुरतीच मर्यादि असते. निवडणुकीच्या काळात मुहूर्त बघून  अर्ज भरणे आणि असेच काही प्रकार सुरू असतात पण,  येडीयुरप्पा याबाबत फारच भोळे आहेत. त्यांच्या पदाबाबत थोडीशीही अनिश्चितता निर्माण झाली की ते लगेच महाराजांच्या आणि संतांच्या भेटीला जातात आणि त्यांचे आशिर्वाद घेतात. त्यांनी आपले पद जाणार नाही असा आशीर्वाद दिला की मग यांचा जीव भांड्यात पडतो.

गेल्या महिन्यात त्यांचे सरकार अगदी जाता जाता वाचले. त्यावर ते मठांत धावून गेले आणि तिथल्या एका हत्तीला काही तरी खायला घालताना त्यांचा फोटो छापून आला. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या मुख्यमंत्रीपदात काही अडचणी येताना दिसायला लागल्या त्याबरोबर त्यांनी एका मांत्रिकाचा सल्ला घेतला. त्यानेही येडीयुरप्पांचा मार्ग निर्वेध व्हायचा असेल तर त्यांना आपल्या नावाच्या स्पेलिग मध्ये काही फेरफार करावा लागेल असा सल्ला दिला. नावात एक डी च्या ऐवजी दोन डी लावून, येडीयुरप्पाच्या ऐवजी येड्डीयुरप्पा असे नाव लावले तर त्यांच्या मार्गातले काटे कुटे दूर होतील असे त्या मांत्रिकाने म्हटले आणि येडीयुरप्पांच्या नावाच्या पाट्या येड्डीयुरप्पा अशा करण्यात आल्या. आता त्यांच्या भ्रष्टाचाराच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे त्यांना या पदावरून काढून टाकावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे.   भारतीय जनता पार्टी केन्द्रातल्या युपीए सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात दंड थोपटून उभा आहे पण भाजपाला आपल्या एका भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या  मुख्यमंत्र्याला पदावर ठेवून मनमोहन सिग यांच्या विरोधात लढा देता येणार नाही. तसा प्रकार सुरू आहे म्हणून काँग्रेसचे नेते वारंवार भाजपाला आपल्या घरातला हा भ्रष्टाचार दूर करण्याचा सल्ला देत आहत. सध्या तरी भाजपा नेते चौकशी सुरू आहे असे म्हणून वेळ मारून नेत आहेत पण त्यांना असे फार दिवस करता येणार नाही. त्यांनी भ्रष्टाचार निर्मुलनाची आंदोलने चालवताना अन्य  मुख्यमंत्र्यांना जो न्याय लावला तोच न्याय त्यांना आपल्या या मुख्यमंत्र्यांना लावावा लागेल.

अ. र. अंतुले यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे गाजवताना भाजपाने, ज्या मुख्यमंत्र्यावर न्यायालयात खटला भरला असेल त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली होती.  पण आता येड्डीयुरप्पा यांच्यावर खटला भरला जावा अशी परवानगी राज्यपालांनीच दिली आहे. तशी परवानगी देण्या इतपत पुरेसे पुरावे आपल्यासमोर आले आहेत म्हणूनच त्यांनी परवानगी दिली असे त्यांचे म्हणणे होते. पण तरीही आता येडीयुरप्पा पदापासून दूर हटायला तयार नाहीत आणि भारतीय जनता पार्टी त्यांना दुर हटवायला तयार नाही. याबाबत त्यांनी स्वतः आणि पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी, येडीयुरप्पा यांचे वर्तन अनैतिक होते, ते  बेकायदा नव्हते अशी सारवासारव सुरू केली आहे पण भारतीय जनता पार्टी ही तर नीतिमत्ता पाळणारी पार्टी आहे असा त्यांचा दावा असतो मग आता या अनैतिक कृत्यावरून राजीनामा देऊन आपली नैतिकता सिद्ध करायला काय हरकत आहे ?

Leave a Comment