पंढरपूर : दीपाली काशिद मृत्युप्रकरणी दादामहाराज मनमाडकर यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल

पंढरपूर-श्रीसंत गाडगे महाराज गयामाता निराधार बालकाश्रमातील विद्यार्थिनी दीपाली सुरेश काशिद हिच्या मृत्यु प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.दीपाली काशिद मृत्युप्रकरणी संस्थेचे दादामहाराज मनमाडकर, आनंद जाधव, दिनकर चव्हाण यांच्याविरूध्द पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पंढरपुरात खळबळ उडाली आहे.

श्रीसंत गाडगे महाराज गयामाता निराधार बालकाश्रमामध्ये दीपाली काशिद राहत होती. ती इयत्ता ९ मध्ये शिकत होती. २५ जानेवारी रोजी रात्री ती अचानक आजारी पडली. तिला उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी दीपालीची तब्बेत गंभीर असून पुढील उपचारासाठी अतिदक्षता विभागामध्ये हलविण्याचा सल्ला दिला. तेव्हा वस्तीगृहाच्या अधिक्षकांनी दीपाली हिच्या नातेवाईकांना पंढरपूरात बोलावून घेतले. त्यांच्या ताब्यात दीपालीला दिले. दीपाली हिला उपचारासाठी अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले. तेथेही तिच्या तब्बेतीमध्ये सुधारणा होईना. डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी सोलापूर येथे नेण्याचा सल्ला दिला. दीपाली हिला सोलापूरकडे उपचारसाठी नेत असताना वाटेत तिचा मृत्यु झाला. दीपाली हिचा मृतदेह नातेवाईकांनी मंगळवेढा येथे नेवून अंत्यविधी केला. या प्रकरणाची कोणालाही माहिती देण्यात आली नाही. मात्र वृत्तपत्रामध्ये वृत्त प्रसिध्द होताच खळबळ उडाली.

सदर प्रकरणाची पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी गंभीर दखल घेवून दीपाली मृत्यु प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे बालकल्याण विभागाचे सोलापूर येथील अधिकारी दीपक ढेपे यांनी दीपाली काशिद मृत्यु प्रकरणास संस्थेचे अध्यक्ष मनमाडकर, आनंद जाधव, दिनकर चव्हाण सर्व रा. गयामाता मठ यांच्याविरूध्द बालन्याय कायदा संरक्षण नियम २००० प्रमाणे २३ नुसार फिर्याद दाखल केली. पोलिसांनी मनमाडकर, आनंद जाधव, दिनकर चव्हाण यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तुकाराम जमादार करीत आहेत. दादामहाराज मनमाडकर यांच्यासह आनंद जाधव, दिनकर चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल होताच पंढरपूरात खळबळ उडाली.

Leave a Comment