अशोकरावांचा आक्रोश

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पाठीराख्यांनी काल एकत्रित येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याच्या संदर्भात त्यांच्याशी काही चर्चा केली. अशोक चव्हाण यांची सध्या गोची झालेली आहे. कारण आदर्श गृहनिर्माण प्रकरणात चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागलेला आहे. सीबीआयने त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलेले आहेच. त्याशिवाय या संबंधातील एक याचिका उच्च न्यायालयात सुद्धा दाखल झालेली आहे. उच्च न्यायालय कोणत्या क्षणी काय निर्णय घेईल आणि कडक भूमिका घेऊन कोणाच्याही विरोधात कधी चाबूक उगारेल याचा काही नेम राहिलेला नाही. त्यामुळे सीबीआयने आरोपी केल्यामुळे धास्तावलेले अशोक चव्हाण उच्च न्यायालयाच्या संभाव्य ताशेर्याावरून प्रचंड तणावाखाली आहेत. दुसर्याल बाजूला या प्रकरणाची राज्य सरकारकडून सुद्धा एक चौकशी सुरू आहेच आणि तिच्यातून सुद्धा काय निष्पन्न होईल याचा काही नेम राहिलेला नाही. अशा सार्याि चौकशा सुरू असल्यामुळे अशोक चव्हाण यांचे राजकीय करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. म्हणूनच चव्हाण समर्थक आमदारांच्या या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसमोर आपली कैफीयत मांडताना, काँग्रेस पक्षाने चव्हाण यांचे करिअर उद्ध्वस्त होईल असे काही करू नये अशी विनंती केली.   

खरे म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे या संदर्भात आता काहीच करू शकत नाहीत. कारण सार्याह प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. त्यांनी निदान राज्य सरकार तर्फे सुरू असलेली चौकशी तरी थांबवावी, अशी विनंती या शिष्टमंडळाने केली आहे. परंतु पृथ्वीराज चव्हाण यांना आता तेही शक्य होणार नाही. कारण त्यामुळे त्यांच्यावरच ठपका येण्याची शक्यता आहे. शिवाय केंद्र सरकारसह राज्य सरकार भ्रष्टाचाराची प्रकरणे निकाली काढण्याच्या मनःस्थितीत आहे आणि या दोन्ही सरकारांना आपली प्रतिमा स्वच्छ असल्याचे दाखवून द्यायचे आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना आता वाचवणे प्रतिमा स्वच्छ करण्याच्या या प्रयत्नाला खीळ बसवल्यासारखे होईल. म्हणून मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला कसलेही आश्वासन दिलेले नाही. अशोक चव्हाण हे काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यांचे करिअर अशा रितीने उद्ध्वस्त होताना काँग्रेस पक्षाने त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे, अशा शब्दामध्ये या शिष्टमंडळाने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या चुकीच्या नाहीत.

काँग्रेस श्रेष्ठींनी आजपर्यंत भ्रष्ट काँग्रेस नेत्यांना अशा रितीने पाठीशी घालण्याचाच प्रयत्न केलेला आहे. किबहुना आजसुद्धा विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिदे यांचेही हात आदर्श गृह निर्माण घोटाळ्याने काही प्रमाणात का होईना रंगलेले आहेत. तरी सुद्धा काँग्रेस श्रेष्ठी त्यांना अजून तरी शिक्षा करण्याच्या मनःस्थितीत आलेले नाहीत. उलट केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलामध्ये सुशीलकुमार शिंदे यांचे खाते टिकलेले आहे तर विलासराव देशमुख यांना प्रमोशन मिळालेले आहे. त्यामुळेच असेल कदाचित अशोक चव्हाण यांच्या समर्थकांनी, विलासरावांना वेगळा न्याय आणि अशोकरावांना वेगळा न्याय का? असाही प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारलेला आहे. त्यातही तथ्य आहे. परंतु हे तथ्य मांडताना अशोकरावही दोषी आहेत हे सत्य त्यांनी मानलेले आहे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि अशोक चव्हाण यांना सुळावर चढवण्यास काँग्रेसश्रेष्ठी का उत्सुक आहेत, हे नीट समजून घेतले पाहिजे. आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहनसिग हे कारभारावरचे नियंत्रण सुटल्यामुळे पूर्णपणे अस्वस्थ झालेले आहेत आणि त्याचा एक भाग म्हणून ते अशोक चव्हाण यांना वाचवण्याच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांना आपली प्रतिमा सुधारून घ्यायची आहे. म्हणून अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी या दोघांना वाचवले जाण्याची अजिबात शक्यता दिसत नाही.

भ्रष्टाचार करणार्यां वर आपण कारवाई करीत असतो हे काँग्रेसच्या नेत्यांना जगाला दाखवायचे आहे आणि त्यासाठी कलमाडी आणि अशोक चव्हाण हे दोघे त्यांच्या तावडीत सापडलेले आहेत. पक्षाच्या प्रतिमेसाठी आणि आपल्या स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी सोनिया गांधी या दोघांचा बळी दिल्याशिवाय राहणार नाहीत. अकबर आणि बिरबल यांच्या एका कथेप्रमाणे माकडीण पाण्यात बुडत असताना आपल्या पिलाला वाचवण्याचा खूप प्रयत्न करते. परंतु पिलाला वाचवण्याच्या भरात आपल्याच नाका-तोंडात पाणी चाललेले आहे हे तिच्या जेव्हा लक्षात येते तेव्हा ती पिलाला पायदळी घेऊन उंच होण्याचा प्रयत्न करते आणि त्याचा बळी देऊन स्वतःची सोडवणूक करते. तशी अवस्था आता झालेली आहे. आपली तथाकथित विश्वासार्हता टिकविण्यासाठी काँग्रेसश्रेष्ठी कलमाडी आणि अशोक चव्हाण यांना पायदळी घेत आहेत. मात्र या गोष्टीचा शेवट काँग्रेसश्रेष्ठींना माहीत नसेल. या गोष्टीतली माकडीण शेवटी स्वतःही बुडून मरतेच आणि पिलू तर मेलेले असतेच. म्हणजे अशोक चव्हाण आणि कलमाडी तर दानाला जाणार आहेतच पण काँग्रेसश्रेष्ठी सुद्धा या पतनातून आता बचावणार नाहीत.     

Leave a Comment