महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक होणार चुरशीची

पुणे: अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कार्यालय दोन वर्षानी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये येणार असल्याने परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीला महत्व प्राप्त झाले असून विद्यमान पदाधिकारी निवडणुकीसाठी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.
     परिषदेच्या निवडणुकीसाठी विद्यमान कार्याध्यक्ष डॉ. वि.भा. देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली चिरंतन पेनेल आणि विद्यमान मुख्य कार्यवाह डॉ. माधवी वैद्य यांच्या नेतृत्वाखाली साहित्योपासक पेनेल रिंगणात उतरले आहे. चिरंतन पेनेलमधून कार्याध्यक्ष पदासाठी डॉ. देशपांडे, प्रमुख कार्यवाह पदासाठी रत्नाकर कुलकर्णी, कोशाध्यक्ष पदासाठी ह.ल.निपुणगे, कार्यवाह पदासाठी दीपक करंदीकर, स्वाती महालंक, नंदा सुर्वे, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, मुकुंद अनगळ, अनिल कुलकर्णी आणि कार्यकारिणी सदस्य पदासाठी डॉ. सतीश देसाई, डॉ. रामनाथ चव्हाण, सु.वा. जोशी हे उमेदवार आहेत.
     साहित्योपासक पेनेलमधून कार्याध्यक्ष पदासाठी डॉ. वैद्य, प्रमुख कार्यवाह पदासाठी मिलिंद जोशी, कोशाध्यक्ष पदासाठी सुनील महाजन, कार्यवाह पदासाठी योगेश सोमण, उद्धव कानडे, डॉ. अरविंद संगमनेरकर, सुनीताराजे पवार, अनंत जोशी, महेंद्र मुंजाल, डॉ. कल्याणी दिवेकर, एड. प्रमोद आडकर आणि प्रकाश पायगुडे निवडणूक लढवीत आहेत.
       या निवडणुकीसाठी एकूण ६८ अर्ज प्राप्त झाले असून अर्जाची छाननी करून अंतिम यादी दि. १० फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येईल. परिषदेच्या मतदारांना दि. १४ फेब्रुवारी पासून मतपत्रिका पाठविल्या जाणार असून दि. १४ मार्च पर्यंत आलेल्या मतपत्रिकांची मोजणी करून दि. १५ मार्च रोजी निकाल जाहीर करण्यात येतील. कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोशाध्यक्ष पदासाठी साहित्य परिषदेच्या सर्व शाखांचे सदस्य; तर कार्यवाह आणि कार्यकारिणी सदस्य पदासाठी स्थानिक सदस्य मतदान करणार आहेत.

Leave a Comment