महाराष्ट्राची नाट्यसंपदा

    महाराष्ट्र आणि मराठी माणसांनी जपलेली काही वेडं आहेत. त्यात नाट्यवेड हे एक आहे. मराठी माणसाला नाटक लिहायला, वाचायला, करायला आणि पहायला आवडतं. एखादा माणूस नाटक हेच आपल्या आयुष्याचं औचित्य आहे असं समजून जन्मभर नाटकालाच आपलं जीवन अर्पण करतो, तेव्हा अशा माणसाला हा महाराष्ट्र डोक्यावर घेतल्याविना रहात नाही. प्रभाकरपंत पणशीकर हा असाच एक नाट्यार्पण माणूस होता. गेली ५५ वर्षे या माणसाने शरीर आणि पोट यासाठी जे काही अपरिहार्यपणे करावं लागतं तेवढं सोडलं तर बाकी सर्व आयुष्य नाटक या एका गोष्टीला वाहिलेलं होतं. त्यामुळे या महाराष्ट्राने काही मान्यवर लोकांना उत्स्फूर्तपणे काही पदव्या बहाल केलेल्या आहेत. त्यातली नटसम्राट ही पदवी सार्‍या मराठी लोकांनी प्रभाकरपंत पणशीकर यांना स्वतःहून दिलेली आहे. वयाच्या ८० व्या वर्षी पंतांचे काल निधन झाले आणि महाराष्ट*ाच्या नाटकाच्या इतिहासातला एक मोठा अध्याय संपला. केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर जगाचा इतिहास घडवणार्‍या काही मोजक्या लोकांकडे पाहिले तर ती माणसे असामान्य प्रतिभेची होतीच, पण त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे समर्पण बुद्धीने काम केले होते असे आढळते. त्यांची ध्येयप्रेरितता हाच त्यांच्या कार्याचा आधार होता.

महाराष्ट्रामध्ये अनेक नाट्यवेडे माणसे होऊन गेली परंतु नाटकाच्या क्षेत्रामध्ये नट, दिग्दर्शक, व्यवस्थापक आणि निर्माता अशा चारही अंगांनी सतत ५०-५५ वर्षे कार्यरत राहणारा पणशीकरांसारखा माणूस होऊन गेला नाही. घरामध्ये नाटकाची परंपरा असती, आई किवा वडिलांकडून अभिनयाचा वारसा मिळाला असता किवा सारीच परिस्थिती अनुकूल असल्यामुळे हे सारे जमून गेले असते तर त्याचे नवल वाटले नसते. परंतु वारसा, आर्थिक स्थिती या सार्‍या गोष्टी कमालीच्या प्रतिकूल असतानाही पणशीकरांनी हा इतिहास घडवला आहे. त्यांनी तो मी नव्हेच, अश्रूंची झाली फुले, वेड्यांचं घर उन्हात, बेईमान इत्यादी अनेक नाटके गाजवली. स्वतः भूमिका केलेल्या नाटकांचे ८ हजार प्रयोग केले आणि दिग्दर्शक म्हणून, निर्माता म्हणून ते जवळपास ४० हजार प्रयोगांचे साक्षीदार राहिले. या सगळ्या गोष्टी करताना त्यांना अक्षरशः वादळ-वार्‍याशी झुंज द्यावी लागली. वेदशास्त्रसंपन्न कर्मठ ब्राह्मणाच्या घरात जन्म झाल्यामुळे नाटकात भाग घेण्यासाठी तोंडाला रंग लावणे म्हणजे घराण्याच्या इभ्रतीला काळीमा फासल्यासारखेच समजले जात असे. अशा वातावरणात शिक्षण अपुरे झाले असतानाही आणि आई नसल्यामुळे विलक्षण हालअपेष्टात जीवन जगत असतानाही पणशीकरांना वयाच्या १५ व्या वर्षी एका नाटकात भूमिका करताना अभिनय हेच आपल्या आयुष्याचे औचित्य आहे, असा एक साक्षात्कार झाला आणि तिथून ६५ वर्षे हा विलक्षण नाट्यमय प्रवास होत गेला. हा सारा प्रवास कोणाला विस्मित करणारा आहे.

सुरुवातीच्या काळात नाटकामुळे घरातून हकालपट्टी झालेली, त्यामुळे खायची-प्यायची तर सोय होऊन गेली. पण झोपायला जागाच नाही. अशा अवस्थेत त्यांनी कधी एखाद्या मंदिरात तर कधी एखाद्या दुकानाच्या फळकुटावर झोप काढली. पण एकदा साक्षात्कार झाल्यानंतर नाटकाची संगत कधी सोडली नाही. त्यांनी तो मी नव्हेच या नाटकाचे २८०० प्रयोग केले. इंग्रजी माणूसही नाटकवेडा असतो. त्यामुळे इंग्लंडमध्ये कोठेतरी शेक्सपिअरच्या एखाद्या नाटकाचे असे विक्रमी प्रयोग झालेही असतील. परंतु तो मी नव्हेच या प्रयोगाच्या विक्रमाला मराठीत तरी तोड नाही. प्रभाकर पणशीकर केवळ नट असते तर त्यांच्या अभिनयाचा आलेख आपल्याला पाहता आला असता. नाटकाचा निर्माता आणि दिग्दर्शक आर्थिक अडचणी सहन करताहेत, वाहतुकीचे प्रश्न सोडवताहेत, मात्र नाटकात भूमिका करणार्‍या नटांना या गोष्टींची काही चिता नसते. मात्र नाट्यसंपदाचे निर्माते-दिग्दर्शक आणि नट अशा सार्‍याच भूमिका पार पाडताना भांडवलाची उभारणी, वाहतुकीच्या सोयी, अन्य नटांच्या लहरी आणि कंत्राटदारांचे संघर्ष अशा सार्‍यांना तोंड देऊन पंत मग एखाद्या भूमिकेत शिरून रंगमंचही गाजवत असत. पणशीकरांचे ‘तोच मी’ हे आत्मचरित्र वाचल्यानंतर त्यांच्या या अनेकरंगी संघर्षाची कहाणी किती रोमांचकारी होती याचा प्रत्यय येतो. पणशीकर मात्र ही कहाणी घडवत गेले, तिच्यातली आपली भूमिका पार पाडत गेले आणि आलीया भोगासी सादर होत गेले. आपला हा संघर्ष किती रोमांचकारी आहे, त्याची इतिहासात काय नोंद होणार आहे, आपण हे सारे का करत आहोत या गोष्टींचा विचार करायला सुद्धा त्यांना कधी उसंत मिळाली नाही.

वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तेव्हा त्यांना थोडे मागे वळून बघण्याची संधी मिळाली आणि स्वतःच्या आयुष्यातले नाट्य बघून ते स्वतःच स्तिमित झाले. खरोखर हे सारे मीच केले आहे का, असा प्रश्न त्यांना पडला. परंतु खरोखरच एका कैफामध्ये आणि धुंदीमध्ये ध्येयप्रवण होऊन त्यांनीच हे केले होते. त्यामुळे त्यांना, तो मी नव्हेच असे म्हणण्याची संधीही राहिली नव्हती.

Leave a Comment