आयपीएलचे स्वागत

    आपल्या देशात काही गोष्टींकडे काही लोक उगाचच टीकेच्या आणि दोषैक दृष्टीने पहात असतात पण थोडा दृष्टीकोन बदलून त्यांनी सकारात्मतेने पहायचे ठरवले तर त्यात किती तरी चांगल्या गोष्टी आढळायला लागतात.  आता आयपीएल बाबत असा दृष्टीकोन ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे कारण सुरूवातीची तीन वर्षे सर्वांच्या टीकेचा विषय झालेल्या या क्रिकेट महोत्सवात काही प्रमाणात भ्रष्टाचार झाला असला तरीही त्यातून अनेक चांगल्या गोष्टीही बाहेर येत आहेत. आता आता या स्पर्धेतली खेळाडूंची बोली संपली आहे.  भारतामध्ये क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे ही वस्तुस्थिती आहे. या खेळाची लोकप्रियता आणि सध्या वेगाने आपल्या जीवनात प्रवेश करत असलेली व्यावसायिकता यांचा मेळ घालून हा  आयपीएल नावाचा उत्सव साकार झाला आहे. ललित मोदी यांनी आय.पी.एल.ची ही कल्पना मांडली, ती पुढाकार घेऊन राबवली.     यात मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल होणार आहे.  देशातल्या काही उद्योगपतींनी यात लक्ष घातले आहे म्हटल्यानंतर खेळाडूंची बोली, स्पर्धांचे आयोजन, त्यांची तिकिटे, प्रसारणाचे अधिकार, जाहिरातींचे अधिकार अशा काही प्रत्यक्ष गोष्टींवर तर करोडो रुपयांची उलाढाल होणारच आहे. परंतु खेळाडूंच्या व्यवस्था, त्यांच्या पाट्यार्, त्यांचे आयोजन, वाहतूक, हॉटेलिग अशा अप्रत्यक्ष रूपाने सुद्धा अब्जावधी रुपयांची उलाढाल होणार आहे.        

गेल्या दहा-वीस वर्षांमध्ये झालेल्या काही आर्थिक परिवर्तनाचे प्रतिबिबच या उलाढालीत दिसणार आहे. लोकांच्याकडे किती पैसा आला आहे याचा काही वेळा अंदाज येत नाही. लोक सुधारले आहेत हे खरे. काही गोष्टींवर पैसे खर्च करायला ते तयार होत आहेत हेही दिसत आहे. परंतु ही वाढ नेमकी किती आहे याचा अंदाज येत नाही. काही तरी एक मध्यममार्गी अंदाज करून एखादी योजना करावी तर लोकांचा तिला असा काही प्रतिसाद मिळतो की, तो आयोजकांच्या प्रतिसादांच्या अंदाजाच्या कितीतरी पट जास्त असतो. क्रिकेटसारख्या लोकांचे वेड झालेल्या खेळात तर असा अनुभव आय.पी.एल.मुळे येतच आहे. एक काळ असा होता की, भारतीय क्रिकेटपटू पूर्णवेळ क्रिकेट खेळू शकत नव्हते. म्हणून ते खेळात मागे पडत असत. पूर्णपणे क्रिकेट खेळावे तर पोट कशाने भरावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा रहात असे. परदेशात खेळाडू हा पूर्णवेळ खेळाडूच असतो, तसे भारतात काही शक्य नाही असे समजले जात होते
    आता तशी स्थिती राहिलेली नाही. इरफान पठाण आणि युसूफ पठाण या दोन बांधवांचे उदाहरण या दृष्टीने फारच उद्बोधक आहे. हे दोघेही वडोदर्‍याच्या एका मशिदीच्या इमामाची मुले. क्रिकेट खेळण्यासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता दोघांच्याही अंगी आहे. परंतु त्यांना धड खेळायला मैदान मिळत नसे. त्यांचे पूर्ण कुटुंब एका खोलीत रहात असे. अशी सगळी दूरवस्था असल्यास मग क्रिकेटमध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा, त्यांचे साहित्य यांचा तर काही प्रश्नच नाही. मशिदीच्या मागच्या मैदानावर जमेल तसे क्रिकेट खेळत राहणे हाच त्यांचा सराव. पण आता तशी स्थिती राहिलेली नाही. या दोन भावांना मिळून ४० लाख डॉलर्स म्हणजे जवळपास २० करोड रुपये मिळालेले आहेत. क्रिकेट खेळाडूंचे दैन्य आय.पी.एल. मुळे कसे दूर होत आहे याचे हे एक चांगले उदाहरण आहे. २५-३० वर्षांपूर्वी करोडपती क्रिकेट खेळाडू ही कल्पना सुद्धा आपण करू शकलो नसतो.
यापासून तरुणांनी बोध घ्यायला काही हरकत नाही. सामान्य कुटुंबातली मुले आपल्या गुणवत्तेच्या आणि चिकाटीने केलेल्या प्रयत्नांच्या आधारे, वशिला नसला तरीही शिखरावर पोचू शकतात हे या भावांनी दाखवून दिले आहे.
    मुक्त अर्थव्यवस्थेमुळे समाजात वाढत चाललेला पैसा आणि समृद्धी यांचा विचार करून हा पैसा क्रिकेटकडे कसा वळवता येईल, याचा योग्य विचार केला गेला त्यामुळे हे घडले. समाजात नुसता पैसा वाढून उपयोगाचे नाही तर तो पैसा खेळत रहावा यासाठी कल्पकतेने काही करणार्‍यांची सुद्धा गरज असते आणि असे कल्पक लोक असल्यास पैशाचे व्यवहार कसे वाढतात आणि त्यातून रोजगार निर्मिती कशी होत राहते हे या आय.पी.एल.च्या महोत्सवाकडे सकारात्मकतेने पाहिल्यास लक्षात येईल. अशा महोत्सवातून आणखी एक गोष्ट घडते, ती म्हणजे गुणवान खेळाडूंची निवड अधिक पारदर्शक होते. जेव्हा निवड समितीला कसलेही आर्थिक व्यवहार न करता संघ निवडायचा असतो तेव्हा प्रादेशिकता, जातीयवाद, वशिलेबाजी आदी गोष्टी चालत असतात. परंतु जेव्हा निवड करणार्‍यांना रोख पैसे मोजायचे असतात तेव्हा वशिलेबाजी करून चालत नाही. पैसे मोजणारा माणूस निखळ गुणवत्तेलाच निवडत असतो. अशा रितीने पुढे येणार्‍या खेळाडूंना आयपीएलमुळे पैसाही मिळतो आणि भरपूर खेळायची संधी मिळून आपली गुणवत्ताही सुधारता येते. हा फायदा आहे आणि तो नजरेआड करता येणार नाही.


Leave a Comment