क्रोध : एक प्रेरणास्थान ????

आपल्या भावनांमुळे मेंदूतील कोणती केंद्रे उद्दिपित होतात हे मेंदूच्या स्केनिंगमुळे कळु शकते. काही भावना सकारात्मक असतात तर काही नकारात्मक. आनंद ही अशीच एक सकारात्मक भावना! लोक आनंदी असताना त्यांच्या मेंदूच्या डाव्या बाजुतील विशिष्ट केंद्रे सक्रीय झालेली दिसतात. याउलट, नैराश्य, चिंता अशा नकारात्मक भावनांमुळे मेंदूच्या उजव्या बाजुतील केंद्रे सक्रीय होतात. पण क्रोधाचे काय? सकारात्मक कि नकारात्मक? स्पष्ट उत्तर देणे कठीण आहे बुवा! याचे कारण असे की मानसशास्त्रीय साहित्य आणि मेंदूचे स्केनिंग यांच्या या विषयातील निष्कर्षात कमालीची तफावत आढळते : मानसशास्त्राने संतापाला नकारात्मक ठरवले आहे तर स्केनिंगने सकारात्मक! मानसशास्त्रज्ञांच्या मते संतापाचे परिणाम काही वेळेला नकारात्मक असतात तर काही वेळेस यातुन आपल्याला आपल्या आवडीच्या गोष्टी करण्याची प्रेरणा मिळत असल्याने ते सकारात्मक ठरतात. या निष्कर्षाच्या पडताळणीसाठी मानसशास्त्रज्ञांनी सुमारे २०० लोक निवडुन त्यांची एक चाचणी घेतली. संगणकाच्या पडद्यावर त्यांना हातरुमाल, पेन, पेले अशा प्रतिमा दाखवण्यात आल्या, त्याच वेळेस एका कोपऱ्यात घाबरलेले, संतापलेले, भावनाशुन्य अशा चेहेऱ्यांच्या प्रतिमाही दाखवल्या गेल्या. पाहत असता, त्यांना त्यातील कोणत्या वस्तु घ्याव्याशा वाटतात त्याची नोंदही करण्यास सांगीतले.

मख्ख चेहेऱ्यांबरोबर दाखवल्या गेलेल्या वस्तूंबद्दल लोकांना अजिबात आकर्षण वाटले नाही. घाबरट चेहेऱ्यांबरोबर दाखवलेल्या वस्तूंबद्दल त्यांना आकर्षण वाटले खरे, पण संतापलेल्या चेहेऱ्याबरोबर दाखवलेल्या वस्तु त्यांना तीव्रतेने हव्याशा वाटल्या. ही तीव्रता इतकी होती कि पाहता पाहता त्यांच्या मुठी गच्च आवळल्या गेल्या. या प्रयोगामुळे संशोधकच चक्रावुन गेले! नेहेमी आपण संताप आणि भय या भावनांना हातात हात घालुन चालताना पाहतो. कारण, संताप लोकांना भयभीत करतो. या प्रयोगादरम्यान मात्र या दोन्ही भावनांना परस्परांपासून विभक्त केल्यास त्यांचे परिणामही वेगवेगळे झालेले दिसले. पण संतापामुळे लोक प्रेरित का झाले याचे स्पष्टीकरण मात्र मिळाले नाही.

आणखी एका निरिक्षणाद्वारेही याचे स्पष्टीकरण मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. धावण्याच्या शर्यतीत अंतिम रेषेच्या जवळ पोहोचलेल्या धावपटुच्या चेहेऱ्यावरही क्रोध दिसतो; पण त्याच वेळेस त्याच्या डोळ्यात दृढ निर्धारही व्यक्त होतो. वैशिष्ट्य म्हणजे या दृढ निश्चयापुढे चेहेऱ्यावरील संतापही फिका पडलेला दिसतो. म्हणजेच आपल्याला प्रेरित करणारी गुरुकिल्ली क्रोध आणि निर्धार या दोन भावनांच्या कुठेतरी मध्ये आहे. त्या धावपटुला मात्र क्रोधाची भावना अजिबात जाणवली नव्हती. पुढे असेही संशोधन केले गेले की गटनेत्याने संतापाचा वापर गटसदस्यांना प्रेरित करण्यासाठी वापरला तर त्यांची कार्यक्षमता वाढेल का? – पण नाही; येथे मात्र मनमिळाऊ नेतृत्वानेच बाजी मारलेली दिसली.

एक गमतीशीर विचार मनात आला, वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी हसतमुख मॉडेल्स दाखवण्याऐवजी कपाळावर आठ्यांचे जाळे पसरलेली, संतापलेली मॉडेल्स वापरली तर ग्राहक त्यांच्या खरेदीसाठी प्रेरित होतील का ?

Leave a Comment